कमाईत एकदम ‘BEST’ पण सर्व्हिस ‘WASTE’! बसमार्गात केलेल्या बदलांमुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय प्रचंड त्रास

काेरोना लशींच्या दोन मात्रा घेतल्याशिवाय लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने बेस्टमधील प्रवासी संख्येत वाढ होत चालली आहे. प्रवासी संख्येसह बेस्टच्या महसुलातही वाढ होत जात आहे. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरमधील प्रवासी आणि महसूलाची तुलना केल्यास त्यात मोठा फरक आढळून येत आहे. त्यानुसार, प्रवासी संख्येत १ लाख ४७ हजारांहून अधिक भर पडली आहे. त्याचवेळी, महसुलात १२ लाख ९५ हजार ९६४ रु.ने वाढ झाली आहे.

    मुंबई : काेरोना लशींच्या दोन मात्रा घेतल्याशिवाय लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने बेस्टमधील प्रवासी संख्येत वाढ होत चालली आहे. प्रवासी संख्येसह बेस्टच्या महसुलातही वाढ होत जात आहे. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरमधील प्रवासी आणि महसूलाची तुलना केल्यास त्यात मोठा फरक आढळून येत आहे. त्यानुसार, प्रवासी संख्येत १ लाख ४७ हजारांहून अधिक भर पडली आहे. त्याचवेळी, महसुलात १२ लाख ९५ हजार ९६४ रु.ने वाढ झाली आहे.

    बेस्ट उपक्रमाने, १ सप्टेंबरपासून बसमार्गात केलेल्या बदलांनी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यावरुन, बेस्ट समिती बैठकीतही सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याचवेळी, लोकलमधील प्रवासासाठी निर्बंध असल्याने मुंबईकरांचा मोठा भर बेस्ट सेवेवर पडला आहे. बेस्टने गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरुवातीस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा दिली. त्यानंतर, सर्वच मुंबईकरांना सेवा उपलब्ध देण्यास सुरुवात केली.

    आता, करोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून लशींच्या दोन मात्र घेतलेल्या प्रवाशांनाच लोकलमधून प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे, बेस्टमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळेच, गेल्या काही दिवसात बेस्ट प्रवासी आणि त्याअनुषंगाने तिकीट महसुलातही वाढ झाली आहे.

    ३० ऑगस्ट रोजी बेस्टच्या प्रवाशांची संख्या २३ लाख ७७ हजार १०२ अशी नोंदविली गेली आहे. त्या तुलनेत ६ ऑगस्ट रोजी प्रवासी संख्येत वाढ होऊन ती २५ लाख २५ हजार ०७४ झाली आहे. महसुलातही भर बेस्टचा ३० ऑगस्ट रोजी महसूल १ कोटी ९० लाख ८७ हजार ९१८ रु. होता. तर, ६ सप्टेंबर रोजी महसूल २ कोटी ३ लाख ८३ हजार ८८२ रु. पर्यंत वाढला आहे. करोनापासून बेस्टच्या महसुलात घट झाली असताना सध्या निर्बंध शिथील केल्याने प्रवासी संख्येसह महसुलात हळूहळू वाढ होत चालली आहे.