मुंबईसह नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई (Mumbai) ला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघर (Palghar) नंतर आता मुंबई आणि नाशिक (Nashik) मध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत २४ तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी ६.३६ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २.७ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.

नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. ४ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती . शुक्रवारी मध्यरात्री ११.४१ च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली.

याआधी गेल्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. पालघर जिल्ह्यात २.८ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.