अनिल देशमुखांच्या दोन्ही सचिवांच्या ईडी कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ, वाझेंच्या समोर दोघांची होणार चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambeer singh) यांनी अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या कथिक शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास ईडीकडून(Ed) सुरु आहे. याच प्रकरणात देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत.

  मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दोघांची कोठडी संपत असल्याने त्यांना आज ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं.

  यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर पालांडे आणि कुंदन यांच्या ईडी कोठडीत सहा जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथिक शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे. याच प्रकरणात देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. त्याच पुराव्यांच्या आधारे ईडीकडून तपास सुरु असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

  ईडीच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी बाजू मांडली. कोर्टात आजचा युक्तीवाद महत्त्वाचा होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे त्याचा तपास आम्हालाल करायचा आहे, असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. आतापर्यंत या प्रकरणात सीबीआयकडून तपास सुरु होता. मात्र आता ईडीदेखील त्या प्रकरणाचा तपास करणार आहे .

  ईडीने शंभर कोटींचा घोटाळा देखील झाल्याचा अंदाज कोर्टात वर्तवला आहे. त्यामुळे या संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडी सचिन वाझेची कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. “आम्हाला सचिन वाझे आणि या आरोपींचा समोरासमोर तपास करायचा आहे. तसेच काही आयपीएस अधिकाऱ्यांनाही तपासासाठी बोलवायचं आहे”, अशी भूमिका ईडीच्या वकिलांनी कोर्टात मांडली.

  ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात देशमुख यांचे दोन्ही स्वीय साहाय्यक हे देखील दोषी ठरताना दिसत आहेत. जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. दोघं स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. पण ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे.

  ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना पंचवीस जूनला ताब्यात घेतलं होतं. दोघंजण ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नव्हते. त्यामुळे अखेर त्याच दिवशी रात्री ईडीने दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर ईडीने दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यावेळी सरकारी वकिलांनी पालांडे आणि शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

  “सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात चाळीस लाख रुपये गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते. सचिन वाझे याने मुंबईतून वसुली करुन पैसे गोळा केले होते. मुंबईतील साठ बार मालकांना रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्यासाठी हे पैसे गोळा करण्यात आले होते. जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात तसं म्हटलं आहे. सचिन वाझेने त्याच्या जबाबात याचा उल्लेख केला आहे. सचिन वाझेला चांगली पोस्टिंग याच करता दिली होती का? याची चौकशी करायची आहे”, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी दिली होती.