एकनाथ खडसे यांना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे ईडीचे कोर्टात स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(eknath khadse) यांनी त्यांच्या विरोधात ईडीने(ED) दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(eknath khadse) यांनी त्यांच्या विरोधात ईडीने(ED) दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत आपण खडसे यांना अटक करण्याची कारवाई करणार नाही, असे ईडीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. एकनाथ खडसे यांना २८ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. या गुन्ह्याचा पुणे एसीबीकडून तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली.

यावेळी ईडीतर्फे अतिरिक्क सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. ईडीने ECIR दाखल केला आहे. हा चौकशीचा भाग आहे. हा काही गुन्हा नाही. ईडीला चौकशीला बोलवायचा अधिकार आहे. समन्स पाठवलं म्हणजे तो व्यक्ती आरोपी आहे असं होतं नाही. असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला. त्यावर खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला.  दरम्यान, कामकाजाची वेळ संपल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तसेच ईडीकडून पुढील सुनावणीपर्यंत खडसेंना अटक न करण्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.