नेत्यांच्यामागे ‘ईडी’पीडा ! केंद्रीय तपास यंत्रणेच्या नजरेत राज्यातील धुरंदर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राकाँ नेते एकनाथ खडसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावई, आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आणि बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले, रवींद्र वायकर, माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अनिल भोसले, आदी नेते ईडीच्या रडावर आहेत. यापैकी काहींना समन्स बजावून कारवाई करण्यात आली आहे, तर काहींवर भविष्यात कारवाई होईल, अशी शक्यता आहे.

  मुंबई : केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपावार राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधीपक्षात बसायची वेळ आली आहे. राज्यातील भाजपा नेत्यांसाठी हे ‘अवजड जागेचे दुखणे’ ठरत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू झालेला धडाका या अभूतपूर्व सत्तांतरानंतर चांगलाच वाढला आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

  ईडीने राज्यातील महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांवर करडी नजर रोखली आहे. यापैकी काहींना समन्स बजावण्यात आले आहेत, तर काही ईडीच्या रडावर आहेत. यामुळे महाराष्ट्रामागे ‘ईडी’पीडा लागली असून येणाऱ्या काही दिवसांत बरेच राजकीय धुरंदर चौकशीचा घेऱ्यात येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

  ‘या’ नेत्यांवर वक्रदृष्टी

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राकाँ नेते एकनाथ खडसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावई, आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आणि बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले, रवींद्र वायकर, माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अनिल भोसले, आदी नेते ईडीच्या रडावर आहेत. यापैकी काहींना समन्स बजावून कारवाई करण्यात आली आहे, तर काहींवर भविष्यात कारवाई होईल, अशी शक्यता आहे.

  बलाढ्य विकासक आणि व्यासायाईकांनाही तडाखा

  राजकीय नेत्यांबरोबरच, राज्यातील बलाढ्य विकासक आणि बड्या व्यावसायिकांनाही ईडीचा तडाखा बसला आहे. यात येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर, कपिल वाधवान व धीरज वाधवान तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल नाथ गुप्ता आणि आणि व्यवस्थापकीय संचालक बाबू लाल वर्मा यांचा समावेश आहे.
  महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भाजपावर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. भाजपा राजकीय हेतूने या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राकाँ नेते एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीबाबत बोलताना हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

  खडसे यांच्या चौकशीच्या प्रकरणात मी काय बोलणार? जे काही सांगायचे आहे, ते ईडीकडून सांगितले जाईल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल. कायदा आपले काम करत असतो. भाजपामध्ये अशा प्रकारे सूड भावनेने काम करण्याची कुठलीही प्रथा नाही.

  - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते