शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर ED ची मोठी कारवाई; कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीसह २३४ कोटीच्या मालमत्ता जप्त

कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. १५ जून २०२१ रोजी विवेक पाटील यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यात विवेक पाटील यांच्या मालकीची कर्नाळा स्पोर्टस अकादमी तसेच त्यांच्या नावे असलेल्या जमीनींवर ईडीने टाच आणली आहे.

  मुंबई :  सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करत सध्या अटकेत असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील  यांची २३४ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा समावेश आहे.

  जमीन-मालमत्तावर ईडीची टाच

  कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. १५ जून २०२१ रोजी विवेक पाटील यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यात विवेक पाटील यांच्या मालकीची कर्नाळा स्पोर्टस अकादमी तसेच त्यांच्या नावे असलेल्या जमीनींवर ईडीने टाच आणली आहे.

  कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे वळवले

  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर २०१९ मध्ये ईडीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी जवळपास ६३ बोगस खात्यांतून पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या खात्यात कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे वळवण्यात आल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनात आले आहे.

  ५२९ कोटीचा घोटाळा

  कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी काही पनवेल संघर्ष समितीने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.