लॉकडाऊनमुळे अवयवदानाला फटका

नीता परब, मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अवयवदानाबाबत प्रचंड जनजागृती होत असल्याने गरजू रुग्णांना जीवनदान मिळत आहे.मात्रमागील काही दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे

नीता परब, मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अवयवदानाबाबत प्रचंड जनजागृती होत असल्याने गरजू रुग्णांना जीवनदान मिळत आहे.मात्र मागील काही दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे अवयदानाला फटका बसला आहे. रत्नागिरीतील १७ वर्षांच्या ब्रेनडेड तरुणाच्या अवयवदानाची तयारी जवळच्या नातेवाईकांनी दाखवली होती. पण जिल्ह्याच्या बंद केलेल्या सीमा व लॉकडाऊनमुळे रत्नागिरीतून मुंबईत तातडीने अवयव आणण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या ब्रेनडेड युवकाच्या अवयवांचे दान होऊ शकले नाही. पण या दिवसातही अवयवदानाबाबत समाजात सकारात्मकता दिसून आल्यामुळे अवयवदान चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली आहे.

मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून अवयवदान चळवळीसाठी विविध संस्था जनजागृतीचे काम करीत आहे. दोन दिवसांपूर्वी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या प्रमुखांना रत्नागिरीतून फोन आला. सतरा वर्षांचा तरुण ब्रेनडेड झाला होता. कोणताही आजार नसताना प्रचंड डोकेदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात एक तरुण उपचारांसाठी दाखल झाला. डाँक्टरांनी विविध चाचण्या केल्यनंतर मेंदूमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन मेंदूचे कार्य थांबल्याचे निदान झाले होते. या तरुणाच्या कुटुंबियांना हा प्रचंड मानसिक धक्का होता. हा धक्का पचवणे नातेवाईकांना खूप कठीण होते. दोन वर्षांपूर्वी फेडरेशनच्यावतीने अवयवदानाच्या प्रचारासाठी मुंबई ते गोवा पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेच्या माध्यमातून अवयवदानाची माहिती या ब्रेनडेड तरुणाच्या नातेवाईकांपर्यत पोहोचली होती.या नातेवाईकाने रुग्णालयातील डॉक्टरांकडे अवयवदानाबाबत विचारणा केली. डॉक्टरांनी मुंबईत फोन करून फेडरेशनच्या प्रमखांकडे चौकशी केली. पण कोरोनामुळे सध्याच्या लॉकडाऊनमुळे अवयवदान व प्रत्यारोपणाबाबत खूपच मोठे आव्हान होते. कारण या तरुणाच्या आईची परवानगी मिळालेली नव्हती. त्याशिवाय रत्नागिरीतील शासकीय रुग्णालय कोरोनाच्या उपचारांचे केंद्र म्हणून तयार केले आहे. इतर कोणतेही रुग्णालय अवयव काढून घेण्यासाठी नोंदणीकृत नव्हते.

मुख्य म्हणजे ब्रेनडेड घोषित करण्यासाठी सरकारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही नव्हती. रत्नागिरीतून मुंबईत अॅम्ब्युलन्सने अवयव घेऊन येण्यास किमान सात- आठ तासांचा अवधी लागणार होता. पोलीस यंत्रणेवरही ताण होता. अवयव काढून घेतल्यावर गरजू रुग्णावर कमीत कमी वेळेत प्रत्यारोपण न केल्यास अवयव निकामी होण्याचा धोका होता. मुख्य म्हणजे या दिवसात गरजू रुग्णही कोरोनाच्या भीतीमुळे अवयव प्रत्यारोपण करून घेण्यास तयार होईल, याचीही शाश्वती नव्हती. प्रशासकीय यंत्रणेकडूनही हिरवा कंदिल मिळालेला नव्हता. त्यामुळे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अवयवदान व प्रत्यारोपणाचा विचार बाजूला ठेवला. पण कोरोनाच्या भयावर मात करूनही अवयवदानाबद्दल लोक विचार करत आहेत, ही सकारात्मक बाब आहे.

कोरोनामुळे आजची परिस्थिती अति विपरित असल्यामुळे अवयवदान शक्य झाले नाही पण तरीही अवयवदानाच्या प्रसारासाठी आम्ही केलेले श्रम नक्कीच वाया गेले नाही. हीच आमच्यासाठी  समाधानाची बाब आहे. – पुरुषोत्तम पवार, संस्थापक द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशन, महाराष्ट्र