नगरविकासमंत्र्यांकडून महत्त्वाची घोषणा, राज्यातील पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आता विशेष धोरणाची तरतूद

पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे(Homes For Police Staff) मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या दोन विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

    मुंबई: मुंबईसह राज्यात(Maharashtra) पोलिसांच्या घरांचा(Homes For Police) प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण आता थांबणार आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे(Homes For Police Staff) मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या दोन विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्यासमोर मांडले जाईल,असे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या एका विशेष बैठकीत जाहीर केले. त्याचवेळी पोलिसांसाठी एक विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्यालाही तत्त्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

    दीड लाख पोलीस हक्काच्या घरांपासून वंचित
    सद्यस्थितीत राज्यातील दीड लाख पोलिस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्यांना घरे मिळवून द्यायची असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यात या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.त्यासोबतच पोलिसांना सेवा बजावताना लागणारी सेवा निवासस्थाने आणि निवृत्तीनंतर लागणारी मालकी हक्काची निवासस्थाने अशी दुहेरी गरज लक्षात घेऊनच या योजनेचे अंतिम स्वरूप तयार करण्यात येणार आहे. त्यावर आजच्या बैठकीत पोलिसांसाठी घरे निर्माण करण्याचे अनेक पर्याय समोर आले असून गृहविभाग व गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने या धोरणाला अंतिम रूप दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

     पोलिसांना जास्तीत जास्त घरे देण्यास प्राधान्य 
    शासनाला मिळत असलेला हाऊसिंग स्टॉक आणि इतर योजनांमधून उपलब्ध होणारी घरे वगळता अजून घरे पोलिसांना कशी उपलब्ध करून देता येतील, याला सरकारचे धोरणाच्या प्रारुपात प्राधान्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज पार पडलेल्या या बैठकीस गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी,राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे व अन्य अधिकारीही उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.