शरजील उस्मानीने उच्च न्यायालयात दिली हमी; म्हणाला, पुणे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक तेढ तसेच सामाजिक अशांतता निर्माण केल्याचा आरोप असलेल्या शरजील उस्मानीने बुधवारी पुणे पोलिसांना सामोरे जाणार असल्याची हमी उच्च न्यायालयात दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने शरजीलवर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

    मुंबई (Mumbai).  एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक तेढ तसेच सामाजिक अशांतता निर्माण केल्याचा आरोप असलेल्या शरजील उस्मानीने बुधवारी पुणे पोलिसांना सामोरे जाणार असल्याची हमी उच्च न्यायालयात दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने शरजीलवर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

    ३० जानेवारी रोजी पुणे येथील स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानीने ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशी विधाने केली असल्याचा आरोप करण्यात आला. शरजीलची ही विधाने धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी असल्याचे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

    त्यानुसार उस्मानीने केलेल्या भाषणाची चौकशी करून उस्मानीविरोधात भादंवि १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून शरजीलने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    शरजील बुधवारी याप्रकरणी चौकशीसाठी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकांत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार तो तिथे हजर राहणार आहे अशी हमी शरजीलच्या वतीने अ‍ॅड. मिहीर देसाई यांनी न्यायालयाला दिली. त्यावेळी मुळ तक्रारदार असलेल्या प्रदीप गावडे यांच्यावतीने बाजू मांडताना अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती खंडपीठाला केली. त्याची दखल घेत न्यायालयाने मुळ तक्रारदाराला याचिकेची प्रत देण्याचे स्पष्ट करत सुनावणी 15 मार्च पर्यंत तहकूब केली आणि तोपर्यंत शरजीलविरोधात कठोर कारवाई न करण्याचे पोलीसांना निर्देशही दिले.