एल्गार परिषद: …तो पर्यंत आरोपींवर आरोप निश्चिती नाही; एनआयएची उच्च न्यायालयात माहिती

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. घडलेला हिंसाचाऱ्यामागे माओवाद्यांचा संबंध आहे आणि माओवाद्यांशी मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संबंध आहे, असा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी अनेकांविरुद्ध गुन्हे नोंदवले होते. त्यात सुधा भारद्वाज यांचाही समावेश होता.

    मुंबई : एल्गार परिषद- माओवादी संबंध या प्रकरणातील आरोपींविरोधात २५ ऑगस्टपर्यंत आरोप निश्चित केले जाणार नाहीत. अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

    ९ ऑगस्ट रोजी एनआयएने १५ आरोपींविरोधात विशेष एनआयए न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये भारतीय दंड संहिता आणि युएपीए कायद्याअंतर्गत सुमारे २० आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. आरोप निश्चित झाले की आरोपींची बाजू ऐकून न्यायालय खटल्याची कारवाया सुरू होणार होती. २३ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित झाली होती. मात्र, आरोपींवर ठेवण्यात आलेल्या आरोपांचा मसुदा आपल्याला दिलेला नाही, असे सांगत आरोपी सुधा भारद्वाज आणि अन्य काही आरोपींना उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    त्यावर शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, एनआयएकडून आरोपीवर लावण्यात आलेल्या आरोपांची तसेच पुराव्यांच्या प्रती अद्याप मिळालेल्या नसल्याची माहिती भारद्वाज यांच्यावतीने अॅड. युग चौधरी यांनी खंडपीठाला दिली. त्यावर सर्व आरोपींना संबंधित कागदपत्रे देण्यात येतील, त्यानंतर उच्च न्यायालयाने बुधवारी या याचिकेवर सुनावणी घ्यावी, असे एनआयएच्यावतीने अॅड. संदेश पाटील यांनी खंडपीठाला सांगितले. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.