एल्गार परिषद प्रकरण: आजारी कैद्याची काळजी घेत नाहीत गौतम नवलखांचा याचिकेतून आरोप

भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवलखा यांना मागील वर्षी अटक कऱण्यात आली होती. तेव्हा पासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. सत्तर वर्षी नवलखा यांची तब्येत मागील काही महिन्यांपासून ठीक नाही. छातीत दुखत असूनही कारागृह प्रशासन उपचार करत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

    मुंबई – नवी मुंबईतील तळोजा कारागृहात वृद्ध आणि आजारी कैद्यांची योग्य पद्धतीने काळजी घेत नाहीत, आरोप कऱणारी याचिका भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (७०) यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे मला कारागृहात न ठेवता घरातच नजरकैदीत ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली असून त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एनआय़ए आणि राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

    भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवलखा यांना मागील वर्षी अटक कऱण्यात आली होती. तेव्हा पासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. सत्तर वर्षी नवलखा यांची तब्येत मागील काही महिन्यांपासून ठीक नाही. छातीत दुखत असूनही कारागृह प्रशासन उपचार करत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कारागृहात पुरेशा पायाभूत सुविधा नसून अपुरे मनुष्यबळ आणि ज्येष्ठ कैद्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा अभाव यामुळे कैद्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. एखाद्या आरोपीची प्रकृती, वय आणि आजारपण लक्षात घेता नजरकैदेत ठेवले जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार याचिकेत देण्यात आला आहे.

    सदर याचिकेवर गुरुवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. तेव्हा, यावर्षी मार्चपासून नवलखा यांना छाती दुखत असून त्यांना अस्वस्थत वाटत आहे. त्यावर उपचार होण्याची गरज आहे, त्यामुळे जसलोक रुग्णालयात त्यांना हलविण्यात यावे, अशी मागणी नवलखा यांच्यावतीने अँड. युग चौधरी यांनी केली. त्यावर नवलखा यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार होऊ शकतात असे प्रमुख सरकारी वकील अरुणा पै यांनी खंडपीठाला सुचविले. दरम्यान, शुक्रवारी त्यांना टाटा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी खंडपीठाला दिली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर राज्य सरकार आणि एनआयएला नोटीस बजावत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली