जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध – रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण

मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवड्यात झालेले रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजन कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे

मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवड्यात झालेले रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजन कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झाल्याचे, त्यासोबत रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवडाभरात झालेले मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झालेले नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य व पुरेपूर काळजी घेऊन त्यांना आवश्यक ते औषधोपचार देण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक आहे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल, याची खात्री करण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची गरज तसेच भविष्याची आवश्यकता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही सुरु आहे. तरीही, मागील आठवड्यात झालेल्या रुग्णांच्या मृत्युंसंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने ‘मृत्यू परिक्षण समिती’ व राज्य टास्क फोर्स यांच्यावतीने देखील चौकशी करण्यात येणार आहे. तसेच १९ मार्च २०२० पासून समर्पित कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत २२५ खाटांच्या या रुग्णालयात आतापर्यंत दाखल रुग्णांपैकी ७५ टक्केपेक्षा अधिक औषधोपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम असणाऱया रुग्णालयांमध्ये या ट्रॉमा केअर रुग्णालयाचा समावेश आहे. डायलिसिस आवश्यक असणाऱया रुग्णांसाठी येथे १० संयंत्रे उपलब्ध असून मागील १ महिन्यांत २०० हून अधिक डायलिसिस करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याचे वृत्तदेखील निराधार आहे. रुग्णसेवेसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात जवळपास ११७ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांचादेखील समावेश आहे. आवश्यक ते सर्व औषधोपचार व सुविधा पुरवून रुग्णांची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.