सार्वजनिक बांधकाम विभागात ऐन टाळेबंदीत बदल्यांसाठी राज्यमंत्री कार्यालयाचा उत्साह? अधिकारात नसलेल्या बदल्याही बेकायदेशीरपणे करण्याचा सपाटा

महाविकास आघाडी सरकारमध्ये  बदली प्रकरणावरून  मंत्र्याचा राजीनामा झाला तरी मंत्र्यांनी काहीही बोध घेतलेला दिसतच नाही, आपल्या अधिकारात नसलेल्या बदल्याही बेकायदेशीरपणे करण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्याच्या विशेष कार्य अधिकारी यांनी लावल्याने पुन्हा एकदा राज्यात हे प्रकरण गाजण्याची चिन्ह असून  आक्रमक विरोधी पक्षाच्या हाती या प्रकरणाने मोठे घबाड मिळण्याची शक्यता आहे.

    किशोर आपटे, मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये  बदली प्रकरणावरून  मंत्र्याचा राजीनामा झाला तरी मंत्र्यांनी काहीही बोध घेतलेला दिसतच नाही, आपल्या अधिकारात नसलेल्या बदल्याही बेकायदेशीरपणे करण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्याच्या विशेष कार्य अधिकारी यांनी लावल्याने पुन्हा एकदा राज्यात हे प्रकरण गाजण्याची चिन्ह असून  आक्रमक विरोधी पक्षाच्या हाती या प्रकरणाने मोठे घबाड मिळण्याची शक्यता आहे.

    राज्यमंत्री कार्यालयाच्या दबावाने बदल्याचे कांड

    राज्यात बदल्यांच्या घोटाळ्यावरून राजकारणात धमासान सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागात  सा. बां. राज्यमंत्री कार्यालयाच्या दबावाने बदल्याचे कांड सुरू असल्याची  उघड चर्चा करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे.सुमारे १०० ते १५० कर्मचाऱ्यांच्या टाळेबंदी असतांना  एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदल्या केल्या जात असल्याने  करोना जीवावर बेतल्यास  जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

    बदल्या करण्याचे बेकायदेशीर आदेश

    मागील वर्षी अशीच परिस्थिती असल्यामुळे जुलै- ऑगस्ट मध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या, यावेळी इतकी घाई का केली जात आहे ? असा प्रश्न या कर्मचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.  करोना महामारीच्या काळात बदल्याबाबत शासनाचे धोरण ठरले नसतांना राज्यमंत्री कार्यालयाकडून बदल्या आताच न करण्याची जबाबदारीची भूमिका घेण्याऐवजी  अधिकार नसतांना अधिकाऱ्यावर दबाव टाकून बदल्या करण्याचे बेकायदेशीर आदेश दिले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    राज्यमंत्र्याना अधिकार कुणी दिले

    महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ या कर्मचाऱ्यांच्या  समाज माध्यम ग्रुप मधून  राज्यमंत्र्यास बदल्याचे अधिकारी कोणी दिले ? कधी दिले ? तसा शासन आदेश आहे का ? वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांचे  बदलाचे अधिकार अधीक्षक अभियंता यांना असतांना  यामध्ये मंत्र्यांचा काय संबंध असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.  राज्यमंत्री कार्यालयातील एका विशेष कार्य अधिकाऱ्याला या बदल्यामध्ये विशेष रस असल्याने आणि .यामध्ये त्याने मोठा अर्थपूर्ण पराक्रम केल्याने हा सर्व बेकायदेशीर प्रकार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

    जुलै-ऑगस्टमध्ये बदल्याचे धोरण

    दरम्यान करोनाची परिस्थिती गंभीर असल्याने आणि मंत्री कार्यालयाच्या बेकायदेशीर आदेशाने होत असलेल्या या बदल्याची प्रक्रिया  तात्काळ थांबविण्यात यावी आणि मागील वर्षी अशीच परिस्थिती असल्यामुळे जुलै- ऑगस्ट मध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या याहीवेळी शासनाचे बदलाचे धोरण ठरल्यानंतर बदल्या करण्यात यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी असून याबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांना निवेदन दिले  जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    विरोधकांच्या हाती मोठं घबाड

    महाविकास आघाडी सरकारमध्ये आगोदरच एका मंत्र्यांला  बदली प्रकरणावरून अडचणींना सामोरे जावे लागले आहे. विरोधकांनी तो विषय प्रचंड ताणून धरला होता. असे असतानाही त्या प्रकरणाहून सरकारमधील मंत्र्यांनी काहीही बोध घेतलेला तर दिसतच नाही, उलट आपल्या अधिकारात नसलेली काम बेकायदेशीरपणे करत असल्याने पुन्हा एकदा राज्यात हे प्रकरण गाजण्याची चिन्ह असून  आक्रमक विरोधी पक्षाच्या हाती या प्रकरणाने मोठं घबाड मिळणार आहे.