‘शीव’ येथील स्‍मशानभूमीत पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कार्यान्वित

दु:खदायक परंतु चिरंतन सत्‍य असणा-या मृत्‍यु नंतर मृतदेहावर अतिंम संस्‍कार करण्‍याची सुविधा करुन देण्‍याच्‍या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपारिक स्‍मशानभूमींसह विदयुत वा गॅस दाहिनी असणा-या स्‍मशानभूमी आहेत. यापैकीच एक असणा-या शीव परिसरातील स्‍मशानभूमीत पर्यावरण पूरक तंत्रज्ञानावर आधारित २ ‘फर्नेस’ नुकतेच कार्यान्वित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये वैशिष्‍टयपूर्ण पध्‍दतीने अत्‍यंसंस्‍कार करण्‍यात येत असल्‍याने यात नेहमीच्‍या तुलनेत निम्‍यापेक्षा कमी लाकडांचा वापर होण्‍यासह पारंपारिक दहन पध्‍दतीच्‍या तुलनेत वेळही कमी लागतो. त्‍याचबरोबर या यंत्रेणेमध्‍ये दहनक्रियेदरम्‍यान निर्माण होणारा धूर ९० ते १०० फूट उंच असणा-या चिमणीद्वारे बाहेर सोडला जातो, तसेच तो धूर ‘वॉटर स्‍क्रबर’ मधून देखील जातो. ज्‍यामुळे धुरातील कणांचे व कार्बनडाय ऑक्‍साइड चे प्रमाण नियंत्रित होण्‍यास मदत होते, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍या मार्गदर्शनात पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ कार्यान्वित करण्‍याची कार्यवाही महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे आणि यांत्रिकी व विदयुत खात्‍याद्वारे करण्‍यात आली आहे. या पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ मध्‍ये मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार करताना प्रथम मृतदेहाला एका वैशिष्‍टयपूर्ण ट्रॉलीमध्‍ये ठेवले जाते. या ट्रॉलीत मृतदेहाच्‍या खाली व वर लाकडाचा एक-एक थर रचला जातो. त्‍यानंतर मृतदेहावर हिंदू पध्‍दतीनुसार आवश्‍यक ते विधी करण्‍यात येऊन त्‍यानंतर अग्‍निसंस्‍कार करण्‍यात येतात. ज्‍या नंतर काही क्षणातच सदर ट्रॉली पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ मध्‍ये ढकलण्‍यात येऊन ‘फर्नेस’ चा दरवाजा बंद केला जातो. यामुळे ‘फर्नेस’ च्‍या आतील भागातील तापमानात मोठया प्रमाणात वाढ होते. यानुसार ‘फर्नेस’ च्‍या आतील भागातील तापमान हे सुमारे ८५० ते ९५० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचते. परिणामी मृतदेहांवरील अंत्‍यसंस्‍कार हे तुलनेने कमी वेळेत व कमी लाकडांसह संपन्‍न होतात.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘शीव’ येथील स्‍मशानभूमीत कार्यान्वित करण्‍यात आलेल्‍या पर्यावरण पूरक अत्‍यंसंस्‍कार पध्‍दतीची महत्‍वाची वैशिष्‍टये पुढीलप्रमाणे आहेत:

१. पारंपारिक पध्‍दतीने स्‍मशानभूमीत अत्‍यंसंस्‍कार करण्‍यासाठी साधारपणे ३५० ते ४०० किलो लाकडांचा वापर होतो. तथापि, पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ मध्‍ये नेहमीच्‍या तुलनेत निम्‍यापेक्षाही कमी म्‍हणजेच सुमारे १०० ते १२५ किलो लाकडांचा वापर होतो.

२. या तंत्रज्ञानानुसार अत्‍यंसंस्‍कार करण्‍यास कमी लाकडे लागत असल्‍याने साहजिकच प्रदूषणही कमी होते व लाकडाची मोठया प्रमाणात बचत होते.

३. पारंपारिक पध्‍दतीने एका मृतदेहावर अत्‍यंसंस्‍कार करण्‍यासाठी सुमारे ४ तास इतका कालावधी लागतो. तर पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ मध्‍ये सुमारे दीड ते दोन तासात अत्‍यंसंस्‍कार होतात.

४. पारंपारिक पध्‍दतीत अत्‍यंसंस्‍कार करताना तुलनेने अधिक प्रमाणात धूर तयार होतो. ज्‍यामुळे ते ठिकाण प्रदूषित होण्‍यासह सामाजिक दृष्‍टया दुर्लक्षित होण्‍याची शक्‍यता असते. पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ च्‍या वैशिष्‍टयेपूर्ण संरचनेमुळे यात धूर तुलनेने कमी होतो. तसेच यातून निर्माण होणारा धूर हा ९० ते १०० फूट उंच असणा-या चिमणीमधून बाहेर सोडला जाताना तो ‘वॉटर स्‍क्रबर’ मधून ‘पास’ होतो. ज्‍यामुळे धुरातील कणांचे प्रमाण व कार्बनडाय ऑक्‍साइड नियंत्रित होतो.

५. पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ चे ‘डिझाईन’ अत्‍यंत मजबूत असल्‍याने या ‘फर्नेस’ ची देखभाल वारंवार करावी लागत नाही. तसेच हिंदू परंपरेनुसार आवश्‍यक ते धार्मिक विधी कोणत्‍याही अडचणी शिवाय करता येतात.

६. ‘शीव’ येथील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या स्‍मशानभूमीत २ पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ कार्यान्वित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये ‘फर्नेस’ चेंबर सह ट्रॉली, वायू प्रदूषण नियंत्रण उपकरण, चिमणी आणि ‘शेड’ इत्‍यांदीबाबीचा समावेश आहे. त्‍याचबरोबर ही यंत्रणा बसवून देणा-या संस्‍थेने ३ वर्षांची देखभाल विषयक हमी (Warranty) देखील दिलेली आहे. या सर्व बाबींसाठी महापालिकेला रुपये ९८ लाख ८८ हजार एवढा खर्च आलेला आहे.

७. वरीलनुसार पर्यावरण पूरक ‘फर्नेस’ कार्यान्वित करण्‍याची कार्यवाही ही महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे व यांत्रिकी व विदयुत खात्‍याद्वारे संयुक्‍तपणे करण्‍यात आली आहे. सदर फर्नेस कार्यान्वित करण्‍यासाठी महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍यातील सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉक्‍टर मंगेश कुंभारे आणि यांत्रिकी व विद्युत खात्‍यातील कार्यकारी अभियंता श्री. संजय शिंदे, सहाय्यक अभियंता श्री. संदीप कोळ्ळे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.