विश्वासघाताने मिळवलेल्या सत्तेचा जाब महापालिका निवडणुकीत लोक विचारणारच; अतुल भातखळकरांचे टीकास्त्र

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत केलेली विधाने म्हणजे निवडणुकीत होणारा संभाव्य पराभव ओळखून कारणे देण्याचा प्रकार आहे. परंतु विश्वासघाताने राज्यात मिळवलेल्या सत्तेचा जाब लोक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही या भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे, अशी टिका मुंबई भाजपा प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत केलेली विधाने म्हणजे निवडणुकीत होणारा संभाव्य पराभव ओळखून कारणे देण्याचा प्रकार आहे. परंतु विश्वासघाताने राज्यात मिळवलेल्या सत्तेचा जाब लोक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही या भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे, अशी टिका मुंबई भाजपा प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

    भ्रष्टाचाराची बोंब ठोकायची ही धूळफेक

    राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष महापालिकेत मात्र स्वबळाचे हाकारे देत आहे. नालेसफाईत शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नालेसफाईचे टेंडर काढताना स्टँडींगमध्ये टक्केवारीचे अंडरस्टॅण्डींग करायचे आणि बाहेर येऊन भ्रष्टाचाराची बोंब ठोकायची ही धूळफेक लोकांच्या लक्षात आलेली आहे. टक्केवारीतला पुरेसा वाटा मिळाला नसल्यामुळे काँग्रेसची तगमग होत असावी बहुधा, असा टोला भातखळकरांनी लगावला.

    भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे

    राज्याच्या सत्तेत एकत्र मलई ओरपणारा काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु विश्वासघाताने राज्यात मिळवलेल्या सत्तेचा जाब लोक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही या भीतीने काँग्रेसला कापरे भरले आहे. त्यातून भाई जगताप आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या प्रभाग पुनर्रचनेवर ठपका ठेवत आहेत असे आ. भातखळकर म्हणाले.

    पुनर्रचना राज्य निवडणूक आयोग करतो

    भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला आहे. परंतु पुनर्रचना कोणताही राजकीय पक्ष करीत नसून राज्य निवडणूक आयोग करतो, एवढे सामान्य नागरीक शास्त्र, जगताप यांना ठाऊक नाही याचे आश्चर्य वाटते, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.

    महापालिकेतील सत्ता टिकवून दाखवा

    ‘भाजपाने गेल्यावेळी जिंकलेले प्रभाग या निवडणुकीत टिकवून दाखवा’, असे आव्हान जगताप यांनी दिले आहे, ‘राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले आहे, काँग्रेसनेही त्यांच्यासोबत हातमिळवणी करावी आणि महापालिकेतील सत्ता टिकवून दाखवावी’, असे आव्हान  यावेळी भातखळकर यांनी दिले आहे.