मुंबईत जिथे कधीच पाणी तुंबायचं नाही तिथेही आज पाणी साचलंय; मनसेची टीका

पावसाचा जोर प्रचंड असल्याने अपेक्षेनुसार, सखल भागांमध्ये पाणी तुंबले. रेल्वेसेवा, बस सेवा, रस्ते वाहतूक सगळ्यावरच परिणाम झाला. पहिल्याच पावसाचा फटका मुंबईला जोरदार बसला. मुंबई पालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता, पण तो दावाच पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. याबाबत बोलताना मनसे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पालिकेवर निशणा साधत सल्ला दिला आहे.

    मुंबई : शहर, उपनगरात ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण,. पालघर या विभागांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर प्रचंड असल्याने अपेक्षेनुसार, सखल भागांमध्ये पाणी तुंबले. रेल्वेसेवा, बस सेवा, रस्ते वाहतूक सगळ्यावरच परिणाम झाला. पहिल्याच पावसाचा फटका मुंबईला जोरदार बसला. मुंबई पालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता, पण तो दावाच पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. याबाबत बोलताना मनसे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पालिकेवर निशणा साधत सल्ला दिला आहे.

    “मुंबईतील सखल भागात पाणी साचणार हे लोकांनी स्वीकारलं आहे पण जिथे आधी पाणी तुंबत नव्हतं तिथेही आज पाणी तुंबलंय ही चिंतेची गोष्ट आहे”, असे ते म्हणाले. तसेचं “पावसाळ्यात मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबायचं ही गोष्ट लोकांनी स्वीकारलीच होती. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी जिथे सखल भाग नाही, अशा दक्षिण मुंबईतील भागात किंवा इतर उपनगरीय भागातदेखील पाणी तुंबल्याचं किंवा साचल्याचं चित्र आहे. जिथे आजपर्यंत कधीही पाणी तुंबत नव्हतं तिथेही आता पाणी तुंबायला लागलंय ही गांभीर्याची गोष्ट आहे. नुसती वरवरची उपाययोजना करून मुंबईकरांना दिलासा मिळणं शक्य नाही. ठिकठिकाणी चालू असलेली मेट्रोची कामं, वरळीच्या कोस्टल रोडची कामं यामुळे अशाप्रकारे पाणी तुंबताना दिसत आहे. त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे विकास करताना इतरांची गैरसोय होऊ नये”, असा सल्ला त्यांनी दिला.

    दरम्यान पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई तीन वेळा करायला हवी. पण पालिकेकडून या गोष्टी करण्यात आलेल्या नाहीत. ब्रिटीशकालीन लोकांनी ही सुविधा ठेवली आहे, पण त्या वाहिन्यादेखील साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे”, असेही ते म्हणाले.

    मुंबई महानगरपालिकेच्या दाव्याची पोलखोल

    “मुंबई महानगर पालिकेने १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा जो दावा केला होता त्याची पोलखोल झाली. चार दिवस आधी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली आणि प्रशासनाला सांगितलं की हे काम अद्याप नीट झालेलं नाहीये. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्या चित्र असं आहे की पहिल्या पावसात मुंबई पूर्णपणे तुंबली आहे. याची जबाबदारी निश्चितच मुंबई पालिकेची आहे. पालिका ७० कोटी रूपये खर्च करून नालेसफाई करते मग त्याचं काय झालं. १५ मे रोजी मुंबई पालिका सर्व काम संपवून सज्ज असायला हवी होती. पण सध्या चित्र फारच विचित्र आहे”, असे मत पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.