अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो

मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीच्या जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.  एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यंना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर विशेष फेरीच्या गुणवत्ता यादी व अलॉटमेटला स्थगिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी २४ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  तिसऱ्या फेरीनंतर मुंबई विभागात अद्याप कोट्याच्या जागा वगळून तब्बल १ लाख ४८ हजार ३८६ जागा रिक्त आहेत.

विशेष फेरीची गुणवत्ता यादी २८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रवेश घेतले आहेत , मात्र आता रद्द करायचे आहेत अशाना ते या फेरीत रद्द करता येणार असून लगेचच विशेष फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.

मुंबई विभागात अकरावीच्या एकूण ३ लाख २० हजार ३९० जागा उपलब्ध असून तिसऱ्या प्रवेश फेरीअंती आतापर्यंत केवळ १ लाख ३५ हजार ४६६ प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. म्हणजेच तिसऱ्या प्रवेश फेरीनंतर आतापर्यंत केवळ ४२ टक्के प्रवेशनिश्चिती मुंबई विभागातून झाली आहे.