महाराष्ट्रात दिवसभरात ३८१ पक्षांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू ; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

राज्यात रविवारी एकूण ३८१ पक्षांचे बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाले आहेत. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याच्या पशू संवर्धन विभागाने जारी केली आहे. याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कुक्कुट पक्षांमध्ये पालघर जिल्ह्यात १०, जळगांव ४०, परभणी २५, अमरावती ११५ आणि नंदुरबार जिल्ह्यात १९०, अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण ३८० इतकी मरतूक झालेली आहे.

  मुंबई (Mumbai).  राज्यात रविवारी एकूण ३८१ पक्षांचे बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाले आहेत. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याच्या पशू संवर्धन विभागाने जारी केली आहे. याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कुक्कुट पक्षांमध्ये पालघर जिल्ह्यात १०, जळगांव ४०, परभणी २५, अमरावती ११५ आणि नंदुरबार जिल्ह्यात १९०, अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण ३८० इतकी मरतूक झालेली आहे.  बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर पक्षांमध्ये एका आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात आकस्मिक मृत्यूची स्थिती आढळून आली नाही.

  मालकांना ३३८.१३ कोटी निधी
  याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७,२०,५१५ कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील ५,८६,६६८ पक्षी समाविष्ट); २६,४४,१७७ अंडी व ७३,००४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.  महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी रु.३३८.१३ लक्ष निधी वितरीत केला आहे.

  सुरक्षा उपायांचे पालन करा
  या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षीधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

  कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे.  पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस माध्यमातून विनंती करण्यात आली आहे.