प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तौक्ते चक्रीवादळात(Cyclone Tauktae) अनेक झाडे कोसळली. मुंबई पालिकेला(BMC) या झाडांची छाटणी आणि उचलून वाहून नेण्यासाठी १ कोटी २३ लाख ३१ हजार रुपये मोजावे लागले आहेत. हा अतिरिक्त खर्च जुन्या कंत्राटदारांना द्यावा लागला आहे.

    मुंबई: पावसाळापूर्व वृक्ष छाटणीसाठी(Tree  Cutting) कुलाबा आणि वांद्रे पश्चिम विभागात नवा कंत्राटदार नेमण्यास विलंब झाल्याने फटका बसला आहे. तौक्ते चक्रीवादळात(Cyclone Tauktae) अनेक झाडे कोसळली. मुंबई पालिकेला(BMC) या झाडांची छाटणी आणि उचलून वाहून नेण्यासाठी १ कोटी २३ लाख ३१ हजार रुपये मोजावे लागले आहेत. हा अतिरिक्त खर्च जुन्या कंत्राटदारांना द्यावा लागला आहे.

    पावसाळ्यात कोसळणारी झाडे(Tree Falling In Rain) उचलण्याची जबाबदारीदेखील याच कंत्राटदारांची असते. यंदाच्या मेमध्ये तौक्ते चक्रीवादळात संपूर्ण मुंबईत ८५० हून अधिक झाडे कोसळली तर १२०० हून अधिक झाडांच्या फांद्या कोसळल्या. कुलाबा आणि वांद्रे परिसरात नवीन कंत्राटदारांची नियुक्ती नसल्याने ही झाडे, फांद्या रस्त्यांवर पडून होती. त्यामुळे जुन्या कंत्राटदारांना पुन्हा काम देण्यात आले.

    धोकादायक, मृत झाडे कापण्यासाठी तसेच कोसळलेली झाडे उचलणे यासाठी सन २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. कुलाबा ए विभागातील मृत झाडे कापणे, उचलणे यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. सुमारे तीन कोटी ४४ लाखांचे हे कंत्राट होते. जून २०२१ मध्ये या कंत्राटाची मुदत संपली होती. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळात या विभागातील झाडे उचलण्यासाठी ७२ लाख ४० हजार रुपये कंत्राटदाराला द्यावे लागले आहेत. त्यामुळे मूळ कंत्राटाच्या किंमतीत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    वांद्रे पश्‍चिम विभागात पाच कोटी नऊ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राटही जून २०२१ मध्ये संपले आहे. पावसाळ्यात त्याच कंत्राटदाराकडून काम करण्यात आले असून यासाठी कंत्राटदाराला ५० लाख ९१ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागले आहेत. मूळ कंत्राटाच्या किंमतीत सुमारे दहा टक्के इतकी ही वाढ आहे. हे दोन्ही प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहे.