दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वाढीव गुण प्रस्तावास १३ मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई: दहावी व बारावीमध्ये खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच दहावीमध्ये एनसीसी, स्काऊट, गाईड, चित्रकला, शास्त्रीय कला आणि लोककला प्रकारात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.

 एनसीसी, स्काऊट, चित्रकला, शास्त्रीय कला, खेळ स्पर्धांमध्ये सामील असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा 

 

मुंबई: दहावी व बारावीमध्ये खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच दहावीमध्ये एनसीसी, स्काऊट, गाईड, चित्रकला, शास्त्रीय कला आणि लोककला प्रकारात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.  परंतु राज्यात पसरलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शाळांना हे वाढीव गुणाचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसाना होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाढीव गुणाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य मंडळाकडून शाळांना २० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 
दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतचा प्रस्ताव शाळा व ज्युनिअर कॉलेजांना ३० एप्रिलपर्यंत  मंडळाकडे पाठवायचा होता. तर शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना यासंदर्भातील प्रस्ताव १५ फेब्रुवारीपर्यंत शाळांकडे आणि शाळांनी २५ फेब्रुवारीपर्यंत मंडळाकडे सादर करायचा होता. परंतु राज्यात पसरलेल्या कोरोनामुळे २१ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे शक्य झाले नाही. यामुळे अनेक पात्र खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण जाली होती. 
 
त्यामुळे शाळा, ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव १३ मेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे तसेच त्यांनी अर्जाची छाननी २० मेपर्यंत मंडळाला सादर करावेत.  त्याचप्रमाणे एनसीसी, स्काऊट गाईड, शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने त्यांचे प्रस्ताव १३ मेपर्यंत शाळांकडे आणि शाळांनी २० मेपर्यंत मंडळाकडे सादर करावेत, असे परिपत्रक राज्य मंडळाने काढले आहे. या निर्णयामुळे क्रीडा, चित्रकला, लोककला, शास्त्रीय कला अशा क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.