तारीख पे तारीख… बारावीचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरताना काही उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व विषय याेजने संदर्भात अडचणी येत आहेत. विषय योजनेसंदर्भात शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश काढत वर्षभर केलेल्या अभ्यासाचीच परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा राज्य मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. काेराेनामुळे मागील काही दिवसांपासून अर्ज भरण्यात येणारी अडचणी तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याने १९ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरताना काही उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व विषय याेजने संदर्भात अडचणी येत आहेत. विषय योजनेसंदर्भात शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश काढत वर्षभर केलेल्या अभ्यासाचीच परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना विषय निवडीची सुविधा उपलब्ध करून देत अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १९ ते २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज भरणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान अर्ज भरण्याची संधी राज्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर कॉलेजमधील जनरल रजिस्टरशी माहिती पडताळून खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचवि डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

बारावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरूवात झाली. मात्र मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात अर्ज भरण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.