कोरोना काळात नेत्रदान घटले; वर्षभरात १७२ जणांकडून नेत्रदान

कोविड काळातच बुरशीजन्य आजार म्युकरमायकोसिस पसरत असल्याने काहींचे डोळे काढावे लागत आहेत. मात्र काढण्यात आलेले डोळे किंवा ज्यांचे काढण्यात आलेल्या रुग्णांना नेत्रदान होऊ शकत नसल्याचे नायर रुग्णालयाच्या नेत्र रोग विभाग प्रमुख डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.

  मुंबई: गतवर्षी मार्च पासून कोरोना काळ सुरु झाला. या काळात बहुतांश इतर रुग्णांचे नुकसान झाले. यात नेत्रदानाचे कार्य देखील मंदावले असून गेल्या वर्षभरात १७२ जणांनी नेत्र दान केल्याचे समोर आले आहे. यातील ११६ जणांना दृष्टी दान होऊ शकले. तर कोरोना काळ सुरु होण्याआधी वर्षाला ४०० ते ५०० नेत्रदान होत असल्याची माहिती मुंबईतील नेत्रपेढी कडून देण्यात आली. नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी गेल्या दीड वर्षाचा काळ कठीण गेला असल्याचे वैधकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  कोरोना काळात सर्व व्यवहार बंद होते. याच काळात अवयदान चळवळ देखील मंदावली होती. त्यात नेत्रदान देखील होऊ शकले नाही. कोरोना महामारीमुळे देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. याच काळात नेत्रपेढी देखील चार महिने बंद ठेवण्यात आली असल्याचे मुंबई नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका सुचित्रा यांनी सांगितले.

  नेत्रदानात आलेले अड़थळे

  कोरोना काळापूर्वी नेत्रपेढीत ४०० ते ५०० कॉर्निया नेत्र प्रत्यारोपणासाठी येत असत. मात्र महामारीत नेत्र दानच घटल्याने बुबुळ प्रत्यारोपणाचे प्रमाण देखील घटले असल्याचे सुमित्रा यांनी सांगितले. रुग्णाचे शव ताब्यात घेण्यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत . तसेच अंत्यसंस्कारासाठी कमी लोक सहभागी होत असल्याने दानासारख्या कामात अडथळे निर्माण होत होते. तसेच मृत कोरोनाने बाधित असल्यास अवयवदान करण्यास निकष ठेवण्यात आले होते. या सर्वातून नेत्रदानाची संख्या कमी झाली.

  म्युकरमायकोसिस रुग्णांचे नेत्र दान व प्रत्यारोपण होत नाही
  कोविड काळातच बुरशीजन्य आजार म्युकरमायकोसिस पसरत असल्याने काहींचे डोळे काढावे लागत आहेत. मात्र काढण्यात आलेले डोळे किंवा ज्यांचे काढण्यात आलेल्या रुग्णांना नेत्रदान होऊ शकत नसल्याचे नायर रुग्णालयाच्या नेत्र रोग विभाग प्रमुख डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले. कोविड काळात नेत्रदान किंवा प्रत्यारोपण करण्याबाबत कोणतीही मार्गदर्शी सूचना अद्याप प्रसारित झाली नसल्याचे डॉ. सहदेव यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना काळात म्युकरमायकोसिस आजार आणि नेत्रदान याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.