पालिकेच्या मुलुंड जम्बो केंद्रामध्ये सुविधा; ‘किड्स फ्रेन्डली’ कोविड सेंटर

सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. पहिल्या लाटेत प्रौढांना जास्त बाधा झाली तर दुसऱ्या लाटेचा प्रभाव तरुणांवर दिसून आला. दुसऱ्या लाटेत बहुतांशी रुग्ण तरुण वयोगटातील आढळून आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

  • तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज
  • उपचारासह मनोरंजनाचीही सोय

मुंबई : मुंबई पालिकेने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार पालिकेने कोविड खाटा वाढवण्यावर भर दिला आहे. आता पालिकेने लहान मुलांसाठी मुलुंड येथील जम्बो कोविड केअर सेंटरचे रुपांतर ‘किड फ्रेन्डली’ सेंटरमध्ये केले आहे. या केंद्रामध्ये लहान मुलांवर उपचारासह त्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था केली आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. पहिल्या लाटेत प्रौढांना जास्त बाधा झाली तर दुसऱ्या लाटेचा प्रभाव तरुणांवर दिसून आला. दुसऱ्या लाटेत बहुतांशी रुग्ण तरुण वयोगटातील आढळून आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोविडवर उपचार करण्यासाठी दिलेल्या स्टिरॉईडमुळे म्युकोरमायकोसिस होत असल्याच्या तक्रारी आहेत. यात काहींचे डोळेही निकामी झाले आहेत, तर काहींनी प्राणही गमावला आहे. फेब्रुवारीच्या मध्यानंतर आलेली दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे.

मुंबईत आता दररोज सरासरी ५०० रुग्ण आढळून येत असून सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. मात्र तरीही कोरोना पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे निर्बंध कायम आहेत. तर दुसरीकडे पालिकेने आपली तयारीही सुरू केली आहे. संभाव्य तिसऱ्या लोटच्या अनुषंगाने जास्त धोका लहान मुलांना आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालिकेने लहान मुलांच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर तयार केली आहेत.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपासून ते जम्बो कोविड केअर सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे १०० खाटांचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांवर त्याचा विपरित परिणाम व्हावा, असे कोणाला वाटत नाही, परंतु, संभाव्य धोका पाहता पालिका आतापासूनच तयार आहे.

खेळापासून अभ्यासापर्यंत सुविधा

लहान मुलांना खुश ठेवण्यासाठी एक प्ले एरिया तयार करण्यात आला आहे. येथे विविध प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. शिवाय मुलांना अभ्यासासह कविता आणि कथा असणारी पुस्तके देखील वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच मुलांसाठी टीव्ही देखील इन्स्टॉल करण्यात आला असून संपूण वॉर्ड कार्टून चित्रांनी रंगवला आहे.

१०० ऑक्सिजन आणि दोन आयसीयु खाटा

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आणि मुलांवर उपचार करण्यासाठी १०० ऑक्सिजन खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय २ आयसीयु खाटा देखील आरक्षित आहेत. प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस आणि स्टाफ, औषधे इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

कोविड सेंटरमध्ये प्रौढ रुग्ण दाखल झाल्यानंतर ते नेहमी चिंताग्रस्त, एकटे दिसून आले. त्यांची चिंता दूर करण्यासाठी डॉक्टरांनी समुपदेशन केले. कुटुंबांशी बोलणे करवून दिले. परंतु, लहान मुलांची बाब पूर्णपणे वेगळी आहे. पालकांशिवाय मुले कशी राहणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मुलांचे मन रमावे, यासाठी त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने सेंटरमध्ये ‘किड फ्रेन्डली’ वॉर्ड तयार केला आहे.

- डॉ. प्रदीप आंग्रे, जम्बो कोविड केअर सेंटर, मुलुंड

Facilities at the BMCs Mulund Jumbo Center Kids Friendly Covid Center