राज्य सरकारने ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे – फडणवीस

मुंबई: देशातील सर्वाधिक रूग्ण आणि देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना

मुंबई: देशातील सर्वाधिक रूग्ण आणि देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही. एवढेच काय, केंद्राकडून जो निधी येतो आहे, तोही खर्च केला जात नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरातील कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही ताण न आणता, आपआपल्या घरातील अंगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले आणि जनतेच्या समस्यांना वाचा फोडली. या आंदोलनात देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील प्रदेश भाजपा कार्यालयात सहभागी झाले होते. यावेळी विनोद तावडे, मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित, राहुल नार्वेकर आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याचीच भूमिका भाजपाने घेतली आहे आणि ती यापुढेही राहील. पण, जनतेने तरी किती यातना सहन करायच्या. त्यांना समस्यांना वाचा फोडणार कोण? आज प्रत्येक घटक संकटात आहे. राज्यात शेतमाल खरेदी पूर्णत: थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. केंद्र सरकारने पैसे दिले तरी खरेदी नीट होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. हातावर ज्यांचे पोट आहे, असे असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा सर्व गरिबांसाठी तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे. राज्य सरकारने ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्र सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ, गुजरात या इतर राज्यांनीसुद्धा पॅकेज जाहीर केले. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकही पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे. केेंद्र सरकारने धान्य दिले. पण, त्याचेही गरजूंपर्यंत वितरण नाही. ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी. राज्यात मृतदेहांशेजारी उपचार आणि एका खाटेवर दोन रूग्ण, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रूग्णांवरील उपचारांची स्थितीसुद्धा अतिशय वाईट आहे. केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. आमचे पोलीस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे १६००च्या वर पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. काही पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या उपचारांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. भाजपाचे हे आंदोलन केवळ सरकारला जागे करण्यासाठी आहे. रूग्णसंख्या ४० हजारावर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.