श्रमजीवी संघटनेच्या अन्न सत्याग्रह आंदोलनाला फडणवीसांनी दिली भेट

मुंबई: श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्नसत्याग्रह कालपासून सुरू करण्यात आला. आज त्या आंदोलनस्थळी भेट देऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी

मुंबई:  श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्नसत्याग्रह कालपासून सुरू करण्यात आला. आज त्या आंदोलनस्थळी भेट देऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शविला. अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागले, हे खरोखरच दुर्दैवी आहे.  आपण सारे कोरोनाचा सामना करीत असताना टाळेबंदीच्या काळात आदिवासी बांधवांना सरकारकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अधिकारी, मंत्री, मा. मुख्यमंत्री असे सारे मार्ग झाल्यानंतर त्यांना नाईलाजाने न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे फडणवीस म्हणाले. 

 उच्च न्यायालयाने स्पष्ट दिशानिर्देश दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारच्या वतीने त्यांना अन्नधान्य मिळत नसल्याने प्रचंड अडचणीच्या स्थितीला सामोरे जावे लागते आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, आदिवासी बांधवांच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे! हे सर्व प्रश्न सरकारदरबारी, प्रसंगी राज्यपालांकडे मांडण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून पुढाकार घेऊ, असे अभिवचन फडणवीसांनी यावेळी दिले. सोबतच, सरकारने समिती गठीत केली असल्याने आता हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती सुद्धा विवेक पंडित आणि अन्य नेत्यांना त्यांनी केली.