MPSC ला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावा; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन याला अधिक कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

    मुंबई : एमपीएससीला स्वातंत्र्य हवं पण स्वैराचार नको, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

    पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

    MPSC च्या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. मोठ्या अपेक्षेने मुलं स्पर्धा परीक्षा देतात आणि दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन याला अधिक कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.