पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीस, दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; भाई जगताप यांची मागणी

पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून ही मागणी केल्याचे भाई जगताप यांनी माध्यमांना सांगितले.

    मुंबई : पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून ही मागणी केल्याचे भाई जगताप यांनी माध्यमांना सांगितले.

    गृहमंत्र्यांना भेटून मागणी केली

    पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वत: जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना ही मागणी केली होती. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे, असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची  विशेष तपास दल (एसआयटी) चौकशी करण्यासाठी मी सरकारला पत्र दिले आहे. त्याला आठ दिवस झाले तरी निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली.

    वाझेंच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो?

    ते म्हणाले की, खूनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असणा-या सचिन वाझेंच्या सांगण्यावरून जर माजी गृहमंत्र्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मी लोकप्रतिनीधी म्हणून बीकेसी प्रकरणी स्वतः जाऊन पत्र दिले आहे, मग राज्य सरकार गुन्हा का दाखल करत नाही? असा सवाल त्यांनी केला. बीकेसी पोलीस ठाण्यात रात्रीच्यावेळी एका व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोहचले होते. याप्रकरणी त्याचे काळाबाजार करणा-या व्यापाऱ्याला वाचवण्याचे काय कारण होते. याबाबत एसआयटी नेमावी अशी गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती असे ते म्हणाले.