devendra fadnavis

 विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी फडणवीस भेटणार असल्याचे सांगण्यात येत असून ही येत्या दोन दिवसांत केव्हाही होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  मुंबई : राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतला. नुकतीच पवार यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते घरी परतले आहेत. महिनाभरानंतर शरद पवारांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी पवार यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी घरीच कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांची दुसरी शस्त्रक्रिया येत्या महिनाभरात होण्याची शक्यता आहे.

  लस घेतल्याची माहिती ट्विट करून देताना पवार यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

  १ मार्च रोजी पहिला डोस

  यापूर्वी शरद पवार यांनी १ मार्च रोजी कोरोना लसीचा  पहिला डोस घेतला होता. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली होती. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.

  पोटदुखीचा त्रास झाल्याने शस्त्रक्रिया

  मात्र पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना ३० मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह ते सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी परतले होते. डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. येत्या १५ दिवसात पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

  प्रकृती संदर्भात विचारपूस

  दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी फडणवीस भेटणार असल्याचे सांगण्यात येत असून ही येत्या दोन दिवसांत केव्हाही होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.