वेळेत झालेल्या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला ; पेरण्यांची लगबग सुरु !

येत्या २४ ते ४८ तासात (१३ आणि १४ जून) मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  त्याच बरोबर पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत बहुतेक जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने हजेरी लावल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्याच बरोबर मुंबईसह कोकणात येत्या ४८ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. मान्सूनचे आगमन राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावत केले आहे. या वेळेत आलेल्या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे.

  मुंबईसह कोकणात मुसळधार

  या शिवाय येत्या २४ ते ४८ तासात (१३ आणि १४ जून) मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  त्याच बरोबर पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  मुंबईची दुस-यांदा तुंबई

  दरम्यान आज दुस-यांदा सलग तिस-या दिवशी मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कमी जास्त राहिला. मुंबई परिसरात पावसाची रिपरिप सुरुच असून मध्येच मुसळधार सरी बरसत आहेत. राज्यातही बहुतांश भागात पावसाची हजेरी आहे. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात, अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती.

  मुंबई परिसरात पावसाचा चक्का जाम

  नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात देखील काल रात्रीपासून पाऊस सुरु होता.  ४८ तासात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे.  माहितीनुसार, दोन दिवसांसाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तीन दिवस रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट आहे.

  मराठवाड्यातही पावसाची शक्यता

  मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील ३-४ तास पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीची लगबग करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

  माजलगाव परिसरामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली तसेच बीड शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा झाले. अंबाजोगाई शहर आणि परिसराला सुद्धा जोरदार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.  जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.

   विदर्भ- उ. महाराष्ट्रात दमदार हजेरी

  मध्यप्रदेश सीमावर्ती भाग आणि विदर्भातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यात तापी आणि पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने आठ दरवाजे यंदाच्या मोसमात पहिल्यांदा उघडण्यात आले असून बावीस हजार चारशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे.