पिकांचं नुकसान करणाऱ्या टोळधाडी पासून शेतकरी बांधवानी सावध  राहावं

- जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे यांचं आवाहन पालघर : गुजरात,राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीचे थवे ताशी 12 ते 16 किमी इतक्या वेगाने

 – जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे यांचं आवाहन

पालघर  :  गुजरात,राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीचे थवे ताशी 12 ते 16 किमी इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका निर्माण होऊ शकतो . ही कीड तिच्या मार्गातल्या वनस्पतीची हिरवी पाने, फुले,फळे,बिया, फांदी,पालवी आदिंचा फडशा पाडत असल्यानं पिकाचं मोठया प्रमाणात नुकसान होत. 

त्यामुळे पालघर जिल्हयातल्या तलासरी, डहाणु आणि जव्हार तालुकयांतल्या शेतकरी बांधवांनी टोळधाडीच्या प्रदुर्भावाबाबत सावध  राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे यांनी केलं आहे.या किडीपासून नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं प्रादुर्भावापूर्वी खबरदारीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विदयापीठाकडून तांत्रिक माहिती प्राप्त झालेली आहे. 

टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित कृषि सहाय्यक आणि तालुका कृषि अधिकारी तसचं कृषि विदयापीठ/कृषि विज्ञान केंद्रातल्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा असं आवाहन पालघर जिल्हा कृषी अधिकरी काशिनाथ तरकसे यांनी  केलं आहे.


शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना :

 शेतकऱ्यांचे गट बनवून रात्री शेतात देखरेख आणि पाहाणी करावी. संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत हे किटक लाखोंच्या संख्यने विश्रांतीसाठी शेतात उतरू शकतात. शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करावा.संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. 

प्रतिबाधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक आझाडिरेक्टीन 1500 पिपिएम 30 मि.ली. किंवा 5 ऽ  निंबोळी अर्काची प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. आमिषाचा वापर 20 किलो गहू किंवा भाताच्या तूसामध्ये फिप्रोनिल 5 एससी, 3 मि.ली. मिसळावे आणि त्याचे ढिग शेतात ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात. आमिषामूळे हि किड मरण पावते. 

टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 ईसी 24 मि.ली किंवा क्लोरपायरीफॉस 50 ईसी 10 मि.ली किंवा डेल्टा मिथ्रिन 2.8 ईसी 10 मि.ली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मि.ली किंवा ल्यांब्डा सायहेलोथ्रिल 5 ईसी 10 मि.ली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मि.ली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

फवारणी शक्यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. अशावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपावर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते. असं ही जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितलं आहे.