एफडीएची तेलाच्या दुकानावर धाड; १.८२ रुपयांचे सात प्रकारचे तेल जप्त

बनावट तेलाच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर धाड घातली. या धाडीत १४१८.६ किलोचे १ लाख ८२ हजार ९६९ रुपये किमतीचे सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले असल्याची माहित एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई (Mumbai).  बनावट तेलाच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर धाड घातली. या धाडीत १४१८.६ किलोचे १ लाख ८२ हजार ९६९ रुपये किमतीचे सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले असल्याची माहित एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घाटकोपर पश्चिमेच्या एलबीएस रोडवरील अंबिका आईल डेपो या ठिकाणी बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती एफडीएला मिळाली. एफडीएच्या युनिट नंबर ८ ने दुकानावर छापा टाकत बनावट तेलाचा साठा जप्त केला असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. कोकोनट ऑइल, वनस्पती तेल, असा एकूण १४१८.६ किलोचा १ लाख ८२ हजार ९६९ रुपयांचा साठा जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले. यामध्ये माली ब्रँडचे ८८.४ किलोग्रॅम वजनाचे २० हजार ६२७ किमतीचे नारळ तेल, सरगम ब्रँडचे ३४३.४ किलोचे ४६ हजार १३० किलो वजनाचे शेंगतेल, बन्सीवाला ब्रँडचे २०८.४ किलोचे २७ हजार ९९४ किंमतीचे राईचे तेल, लायन ब्रँडचे वनस्पती डालडा ७७८.४ किलोचे ४६ हजार १३० रुपये किमतीचे उत्पादन तेलही जप्त करण्यात आले. जप्त केलेला माल १४१८.६ किलो असून, त्याचे बाजार मूल्य १ लाख ८२ हजार ९६९ रुपये इतके आहे.

तर दिवाळीदरम्यान राज्यभरात एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये ४८ लाख ४४ हजार ५३२ रुपये किमतीचे खाद्यतेल, तूप, वनस्पती जप्त केले होते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (अन्न) सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.