खासगी डॉक्टरला कोरोना झाल्याने घाटकोपरमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई :घाटकोपर (प.) येथे खासगी दवाखाना चालविणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईमधून उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती

मुंबई : घाटकोपर (प.) येथे खासगी दवाखाना चालविणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईमधून उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. त्या डॉक्टरच्या पत्नीला व पेशाने डॉक्टर असलेल्या मुलाला कॉरंटाइन करण्यात आले आहे. तर डॉक्टर राहत असलेल्या घटकोपर येथील जगदुशानगमधील इमारतीला ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र या डॉक्टरला कोरोनाची लागण होईपर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्या झोपडीपट्टीतील अनेक रुग्णांचे काय, त्यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर, त्या रुग्णांची तपासणी कोण करणार, अद्यापही त्यांची तपासणी का करण्यात आलेली नाही, उद्या या रुग्णांमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास काय करणार, पालिका यंत्रणा काय करतेय, असे प्रश्न निर्माण ज़ाले आहेत. तर दवाखान्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे.

तेथील नागरिकांची व त्या दवाखान्यात ‘त्या’ कालावधीत आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याची मागणी केली जात असल्याचे समजते.घाटकोपर (प.), गोळीबार रोड,जगदूशानगर, शिवाजी चौक, शिल्पा बिल्डिंगच्या मागे, शिवगणेश सेवा मंडळ,  स्वयंभू शिवगणेश मंदिरासमोर सदर डॉक्टरचा दवाखाना आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून या दवाखान्यात सकाळपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत झोपडपट्टीतील  रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात. अगदी कोरोनाचा अधिक फैलाव झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले असतानाही हे डॉक्टर स्वतःचा दवाखाना सुरू ठेवून रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य  करीत होते. त्यांच्या या दवाखान्यात कुर्ला, मुलुंड येथील काही रुग्णही उपचारासाठी येत असतात.  दररोज त्यांच्याकडे किमान ५०-६० जण ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, जुलाब, उलट्या, कान, नाक, घसादुखी, शरीराला मार लागणे, खरचटणे, पायात,हाताला चमक भरणे आदी विविध आजारांसाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे त्यांचा दवाखाना नेहमीच गर्दीने भरलेला असतो. तसेच त्यांच्याकडे रुग्णांना औषधे देण्यासाठी व रुग्णांची नोंद ठेवण्यासाठी ३-४ मुली आहेत. एक बाई साफसफाई करायला जाते. या डॉक्टरांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. पण तरीही ते रुग्णांची सेवा करीत होते आणि रुग्णांना वैद्यकीय उपचार देत होते.     

शनिवारी त्यांना कोरोनासारखी लक्षणे वाटल्याने त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाने सोमवारी तात्काळ ठाणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आता त्यांच प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे यासंदर्भातील माहिती पोहोचली आहे. त्यामुळे सदर डॉक्टर राहत असलेल्या इमारतीला सील केले असून कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या दवाखान्यात एवढे दिवस सदर डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेल्या नागरिकांची तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पालिकेने या नागरिकांच्या तपासणीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा या विभागात एका एका घरात किमान ४- ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत  आहे. दरम्यान,  गंभीर प्रकरणात उशीर झालेला असला तर नागरिकांची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.