मुंबईत ”कम्युनिटी ट्रान्समिशन” नसल्याचे ”फिव्हर क्लिनिक”च्या आकडेवारीवरून स्पष्ट

मुंबई: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या आजारास प्रभावी प्रतिबंध होण्यासाठी बाधित व्यक्तींचे निदान व विलगीकरण लवकरात लवकर करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका स्वतः पुढाकार घेऊन बाधित रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेत आहे. यासाठी महापालिकेने ९७ फिव्हर क्लीनिक आणि काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली देशातील पहिली ''दूरध्वनी'' हेल्पलाइन याच शोध मोहिमेचा भाग आहे.

 मुंबई: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या आजारास प्रभावी प्रतिबंध होण्यासाठी बाधित व्यक्तींचे निदान व विलगीकरण लवकरात लवकर करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका स्वतः पुढाकार घेऊन बाधित रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेत आहे. यासाठी महापालिकेने ९७ फिव्हर क्लीनिक आणि काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली देशातील पहिली ‘दूरध्वनी’ हेल्पलाइन याच शोध मोहिमेचा भाग आहे.

काय आहे नक्की फिव्हर क्लीनिक?
पालिका क्षेत्रातील ज्या भागात रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे अशा भागांमध्ये महापालिकेद्वारे ‘फिव्हर क्लिनीक’चे आयोजन करण्यात येत आहे. या ‘क्लिनिक’मध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यानुसार महापालिकेने आजवर ९७ ‘फिव्हर क्लिनीक’ चे आयोजन केले आहे. या ‘क्लिनिक’मध्ये आजवर ३ हजार ५८५ व्यक्तींची करोना विषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली. ज्यापैकी निर्धारित निकषांनुसार ९१२ व्यक्तींचे नमुने आवश्यक त्या तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर ५ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. हे पाच व्यक्तीदेखील ‘ट्रॅव्हल हिस्टरी’ असणारे वा ट्रॅव्हल हिस्टरी असणाऱ्यांच्या निकटच्या संपर्कात असणारे होते, ही बाब आवर्जून लक्षात घ्यायला हवी.
‘फिव्हर क्लिनिक’ हे अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये आयोजित करण्यात येतात, ही बाब लक्षात घेतल्यास आणि तपासणी करण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींचे नमुने बाधित आढळून आले. याचाच अर्थ ०.५४ टक्के अर्थात सुमारे अर्धा टक्के लोक बाधित आढळून आले. बाधित व्यक्तींची ही आकडेवारी लक्षात घेतल्यास;  क्षेत्रात ‘सामुदायिक संसर्ग’ नसल्याचे स्पष्ट होते.
 
 
वैद्यकीय मार्गदर्शनासाठी पालिकेची दूरध्वनी ‘हेल्पलाइन’; ६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी घेतला लाभ
 
ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणे जाणवत असतील; त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे, याकरिता दूरध्वनी हेल्पलाइनची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दूरध्वनी क्रमांक ‘०२०-४७०-८५-०-८५’ यावर सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना प्राप्त होत आहे. 
 
या प्रकारच्या देशातील या पहिल्याच दूरध्वनी हेल्पलाइनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या काही दिवसात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी दूरध्वनी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे. तर यापैकी ३०० पेक्षा अधिक व्यक्तींना ‘करोना कोविड १९’ विषयक वैद्यकीय तपासणी करवून घेण्यासाठी ‘रेफर’ करण्यात आले आहे. हे करताना संबंधितांना त्यांच्या घरी येऊन नमुने घेऊन जाणाऱ्या प्रयोगशाळांचे ‘दूरध्वनी क्रमांक’ हे ‘कॉल सेंटर’ द्वारे देण्यात येत आहे. जेणेकरून संशयितांना त्यांची वैद्यकीय चाचणी करवून घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. 
.. 
महापालिकेच्या हेल्पलाइनवर दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तींपैकी १ हजार २०० पेक्षा अधिक व्यक्तींना घरच्या घरीच विलगीकरण (Home Quarantine) करण्याच्या सूचना देण्यात येतात. ज्यामध्ये घरच्या घरी विलगीकरण करताना “काय काळजी घ्यावी, ते कसे करावे, किती दिवस पर्यंत करावे?” इत्यादी बाबतचे मार्गदर्शन व सूचना संबंधित व्यक्तिला दूरध्वनीद्वारेच देण्यात येत आहेत. तसेच आवश्यकतेनुसार सदर सूचना त्यांच्या घरातील व्यक्तींना देखील दूरध्वनीद्वारे देण्यात येत आहेत. जेणेकरून ‘करोना कोविड १९’ या आजारास अधिक प्रभावीपणे आळा घालता येईल.
 
महापालिकेच्या या कॉल सेंटरच्या सुविधेमुळे ‘करोना कोविड १९’ ची लक्षणे वाटत असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मनातील शंकेचे निरसन सहजपणे व घरबसल्या करता येत आहे. या दूरध्वनी मार्गदर्शना दरम्यान दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे, असे तज्ञ डॉक्टरांना आढळून आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून ‘करोना कोविड १९’ ची चाचणी करवून घेण्याचे निर्देशित करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने कॉल करणाऱ्या सर्व नागरिकांची लक्षणे, दूरध्वनी क्रमांक, राहत असलेला परिसर इत्यादी बाबींची सुव्यवस्थित नोंद कॉल सेंटर मध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे या ‘कॉल सेंटर’ला ज्यांनी फोन केले आहेत, त्यांना ‘कॉल सेंटर’ द्वारे ‘फोन’ करण्यात येत असून त्याद्वारे आवश्यक तो पाठपुरावा देखील नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरच्याघरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींबाबत देखील ‘कॉल सेंटर’ द्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे