शिरकावाच्या वर्षभरानंतरही कोरोनाशी लढा सुरुच

डिसेंबर अखेरनंतर आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा नवीन वर्षात डोकेवर काढले आहे. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये रोज साडेतीनशे ते चारशेपर्यंत आढळणा-या रुग्णांची संख्या आता हजार पार झाली आहे. त्यामुळे वर्षभऱानंतरही कोरोनाशी लढा सुरुच राहिला आहे.

    मुंबई: मुंबईत कोरोनाने गेल्या वर्षीच्या ११ मार्चला शिरकाव केल्यानंतर वर्षभरानंतरही ठाण मांडले आहे. एप्रिल मे व जूनमध्ये संपूर्ण मुंबईत कोरोनाने कहर केला. त्यामुळे करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांतील घटकांना त्याचा फटका बसला. डिसेंबर अखेरनंतर आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा नवीन वर्षात डोकेवर काढले आहे. नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये रोज साडेतीनशे ते चारशेपर्यंत आढळणा-या रुग्णांची संख्या आता हजार पार झाली आहे. त्यामुळे वर्षभऱानंतरही कोरोनाशी लढा सुरुच राहिला आहे.

    चीनमधील हुवांग येथे कोरोनाने कहर केल्यानंतर हा संसर्ग जगभरात पसरला. ११ मार्चला कोरोनाचा मुंबईत पहिला रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांतच ही संख्या झपाट्याने वाढत गेली. दिवसेंदिवस चाळी, झोपडपट्टी इमारतींना कोरोनाचा विळखा बसायला लागल्याने राज्य सरकाने २३ मार्चला लॉकडाऊन लागू करण्यात आले. रेल्वे, रस्त्यावरची वाहतूक, बाजापेठा, हॉटेल आदी बंद झाली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहिल्याने बेस्टच्या बसेस फक्त धावत होत्या. एप्रिल – मे व जूनमध्ये कोरोनाने कहर केला. रोजच्या रुग्णांची संख्या अडीच हजारच्या पार गेल्याने पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी राज्य व पालिकेच्या प्रभावी उपाय़य़ोजनेमुळे जुलैनंतर कोरोना नियंत्रणात आला. ऑगस्टनंतर टप्प्या- टप्प्याने अनलॉक सुरु झाल्यानंतर सण, उत्सवांना, बाजारपेठांत कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून लोकांनी गर्दी केल्याने पुन्हा कोरोनाची संख्या वाढली.

    ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढ झाली. ३० ऑगस्ट रोजी १,१७९ आणि ३१ सप्टेंबरमध्ये २,६५४ रुग्ण संख्या नोंदविले गेले. मात्र पालिकेने विविध मोहिमा, उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी राबवल्याने पुन्हा कोरोना उतरणीला लागला. अडीच हजारपर्यंत रोज आढळणा-या रुग्णांची संख्या एक हजारा पर्यंत आली. मंदिरे, पर्यटनस्थळे गार्डन, मैदाने, हॉटेल सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सुरु झाल्याने गर्दी वाढली. लोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. गेल्यावर्षी मार्चपासून मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण वर्षभर मुक्काम ठोकला आहे. मागील वर्षी मार्च, एप्रिल- मे मध्ये कोरोनाने कहर केला होता. आता पुन्हा मार्चमध्ये कोरोनाची रोजची रुग्णसंख्या हजार पार झाली आहे. गेल्यावर्षी ११ मार्चला मुंबईत एक रुग्ण सापडला होता. वर्षभरानंतर आतापर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ५८४ वर पोहचली आहे. यातील ३ लाख १२ हजार ४५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११५०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता एकूण अॅक्टीव रुग्ण १० हजार ७३६ आहेत.

    प्रत्येक महिना अखेरपर्यंत नोंद झालेली रुग्णसंख्या – (मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत)
    महिना – रुग्ण
    मार्च – १८२९
    एप्रिल- ६,८७४
    मे- ३९,४६४
    जून- २८,४७३
    जुलै- २०,५६९
    ऑगस्ट- ३०,५५४
    सप्टेंबर – २६,५४०
    ऑक्टोबर- १८,७५३
    नोव्हेंबर- १३,००८
    डिसेंबर- ८,०९४
    जानेवारी- ५,७९५
    फेब्रुवारी- ९,७१५
    ९ मार्च – १०१२