File an FIR against the concerned regarding the deaths at the covid treatment center in Mulund vb
मुलुंडच्या कोविड उपचार केंद्रातील मृत्यूंबाबत संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करा

मात्र या अटींचे पालन या संस्थेकडून होत नसल्याचे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. उपचार केंद्रात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा ३० ते ५० टक्के कमी आहे.

  • भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे सुरु करण्यात आलेल्या जंबो उपचार केंद्रातील निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाबाबत हे केंद्र चालविणाऱ्या आशा कॅन्सर ट्रस्ट व रिसर्च सेंटरवर महापालिकेच्याच यंत्रणेने ठपका ठेवला असून, या अहवालाच्या आधारे या केंद्रात झालेल्या मृत्युंबाबत ट्रस्टचे संचालक, केंद्रातील कर्मचारी व या ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा व  आशा कॅन्सर ट्रस्ट बरोबरच्या कराराचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी भाजपा आ. मिहीर कोटेचा यांनी केली आहे.  या संदर्भात आपण मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठविणार असल्याचेही कोटेचा यांनी नमूद केले.

कोटेचा यांनी सांगितले की, आशा कॅन्सर ट्रस्ट व रिसर्च सेंटर या संस्थेला मुलुंड येथील ६०० खाटांच्या कोविड उपचार केंद्राला आवश्यक तो कर्मचारी वर्ग पुरविण्याचे कंत्राट जुलै मध्ये देण्यात आले आहे. यासाठी या संस्थेला करारात काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र या अटींचे पालन या संस्थेकडून होत नसल्याचे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. उपचार केंद्रात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा ३० ते ५० टक्के कमी आहे.

या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना सेवा पुरविण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या बाबत लोकप्रतिनिधींनी तक्रारीही केल्या होत्या. तसेच ट्रस्टने नियुक्त केलेल्या परिचारिका पुरेशा प्रशिक्षित नाहीत, असेही आढळून आले आहे. त्याबरोबरच रुग्णांना घरी केव्हा सोडायचे याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन या ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांकडून झालेले नाही. रुग्ण बरा झाला असूनही त्याला उपचार केंद्रातच थांबवून ठेवले जाते. अशा तक्रारींच्या आधारे पालिकेच्या सहाय्य्क आयुक्तांनी या केंद्राला नोटीसही पाठविली आहे.

या उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काही रुग्णांना आवश्यकता असूनही रेमिडीसिव्हर इंजेक्शन देण्यात आलेले नव्हते, मात्र काहींना आवश्यकता नसताना हे इंजेक्शन देण्यात आले, तसेच काही रुग्णांना प्राणवायू पुरवठा करणे गरजेचे असूनही रुग्णांना वेळेत प्राणवायू पुरवठा होऊ न शकल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

काहींना गरज नसताना प्राणवायू दिल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही जणांना प्राणवायू पुरवठा केला जात आहे, असे कागदपत्रांतून दाखवले गेले, प्रत्यक्षात मात्र प्राणवायू पुरवठा सुरूच नव्हता असे प्रकारही आढळून आल्याचेही आ. कोटेचा यांनी नमूद केले. या केंद्रात झालेल्या मृत्युंबद्दल ट्रस्टचे संचालक, कर्मचारी व या ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा, अशी मागणीही कोटेचा यांनी केली.