अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात केव्हापर्यंत येईल याबाबत कोणतीही शक्यता वर्तवता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे हा निर्णय जाहीर केला. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांना परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिखर संस्थेकडे परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.राज्यातील  १४ सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाला ७ लाख ३४ हजार ५१६ तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २ लाख ८३ हजार ९३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

कोरोनाची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने परीक्षेसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून ये-जा करणे, एकत्र जमा होणे याचा विचार होणे गरजेचे आहे. सध्या राज्यातील राज्यातील ४१ कॉलेजांच्या इमारती आणि १९८वसतिगृहे ही विलगीकरण कक्षासाठी वापरण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. कोरोना नियंत्रणात केव्हापर्यंत येईल याबाबत कोणतेही भाकित करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जुलैमध्ये घेणे व्यावहारीकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय १८ जूनला झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला. मात्र त्याचवेळी परीक्षा देण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असेल त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना स्थानिक पातळीवरील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता प्रमाणपत्र हवे असेल त्यांना विद्यापीठांनी योग्य सूत्र वापरून त्यांचा निकाल जाहीर करावा अशा सूचना बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. 

राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या १८जूनला झालेल्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तूकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापन शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला दिल्लीत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थेची मान्यता असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय शिखर संस्थेकडे पाठवण्यात आला असून, त्यासंदर्भात स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाबाबत निर्णय

– मागील सर्व सत्रांत उतीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांनी लेखी द्यावे. त्यानंतर विद्यापीठांनी योग्य सूत्र वापरून निकाल घोषीत करावा

– सर्व सत्रांत उतीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असल्यास त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी. कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

– बॅकलॉग विषयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकार्‍यांची शासनस्तरावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल.