कोकणच्या वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत फसवी:  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे टीकास्त्र 

कोकणच्या जनतेविषयी आघाडी सरकारला असणारी अनास्था या मदतीतून प्रकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत बागायतदार , मच्छीमार यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल व मंत्र्यांकडून सांगितले गेलेले नुकसानीचे आकडे यात मोठी तफावत आहे.

  मुंबई : कोकणातील वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली २५२ कोटींची मदत फसवी असून यातून वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही. कोकणवासीयांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी सरकारने मदतीचा उपचार पार पाडला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. दरेकर यांनी सांगितले की, कोकणच्या वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत खूपच तोकडी आहे. नुकसानीचे प्रमाण पाहता राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कोकणवासियांची क्रूर थट्टा करणारी आहे.

  नुकसानीच्या प्रमाणात मदत नाहीच

  दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोकणच्या जनतेविषयी आघाडी सरकारला असणारी अनास्था या मदतीतून प्रकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत बागायतदार , मच्छीमार यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल व मंत्र्यांकडून सांगितले गेलेले नुकसानीचे आकडे यात मोठी तफावत आहे. अशा स्थितीत वादळग्रस्तांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात शासनाकडून मदत मिळणे  अशक्य आहे.

  मलमपट्टी म्हणून मदत जाहीर

  निसर्ग चक्रीवादळानंतर दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा अधिक भरपाई देऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. आंबा, सुपारी, नारळ बागायतदारांचे प्रत्यक्षातील नुकसान जाणून न घेताच ही मदत जाहीर केली आहे. वादळग्रस्तांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन मलमपट्टी म्हणून मदत जाहीर केली आहे.नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

  मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन

  राज्य शासनाने केलेली २५२ कोटींची  मदतीची  घोषणा कोणत्या अहवालाच्या आधारे केली हे शासनाने जाहीर करावे. मागील वर्षी निसर्ग वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत अद्याप ५० टक्के वादळग्रस्तांना मिळालेली नाही. त्यामुळे आता जाहीर केलेली २५२ कोटींची मदत तरी तातडीने वादळग्रस्तांना वितरीत न केल्यास आपण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करू , असेही आ. प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले.