
मुंबई : कोरोनाच्या नव्या अवतारावरून शिवसेनेने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादेत येऊन कोरोना पसरविला होता आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दिल्लीत येऊन कोरोना पसरविणार काय असा सवालवजा टोमणा शिवसेने भाजपाला हाणला आहे.
जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत. ऑस्ट्रेलियात नव्या कोरोना विषाणूचे ८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तेथील अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच, काळजी करावी अशी परिस्थिती नव्याने निर्माण झाली आहे असेही शिवसेनेने म्हटले.
ब्रिटनचा उल्लेख केला बहिष्कृत
ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले. ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा तर मोठाच प्रश्न आहे. दिल्लीतील २६ जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सन प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचे, हा प्रश्नच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.