भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसा, वैतरणा या धरणांपाठोपाठ मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता भातसा धरणही पूर्ण क्षमतेने भरू लागले आहे. त्यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे भातसा धरणद्वार विभागाचे उपअभियंता रवी पवार यांनी सांगितले.

    शहापूर : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसा, वैतरणा या धरणांपाठोपाठ मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता भातसा धरणही पूर्ण क्षमतेने भरू लागले आहे. त्यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे भातसा धरणद्वार विभागाचे उपअभियंता रवी पवार यांनी सांगितले.

    दरम्यान गेल्या तीन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गेले दोन दिवस कहर केला असून, धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. १५ दिवसांपूर्वी तानसा व वैतरणा धरण तुडुंब भरले असताना, भातसा धरणाच्या पातळीतही कमालीची वाढ होत होती. त्यातच मंगळवारी दुपारी ३.३०च्या सुमारास पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे ३ दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. मात्र, पाण्याची आवक लक्षात घेऊन सायंकाळी ५.३० च्या सुमारास धरणाचे पाचही दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. मंगळवारी धरणाची पाण्याची पातळी १४०.५ मीटर इतकी असून, धरण भरून वाहण्याची पातळी १४१ मीटर इतकी आहे. सध्या धरण काठोकाठ भरले असून, पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन धरणाचे पाचही दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असल्याचे धरण कार्यालयाकडून सांगण्यात आले.

    त्यामुळे धरणातून ४ हजार क्सुसेक्स इतका पाण्याचा प्रवाह सुरू आहे. भातसा धरण भरून वाहू लागल्याने मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट कायमस्वरूपी मिटले आहे. भातसा धरण वाहू लागल्याने, भातसा नदीच्या पात्रातही पाण्याची पातळी वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणाखालील शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील तहसील कार्यालयांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत़ तर नदीकाठच्या साजिवली, सावरशेत, खुटाडी, अर्जुनली, सापगाव, सरलांबे आवरे, हिव, अंदाड, कांबारे, खुटघर, भातसई, वासिंद, शहापूर आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.