जनसंपर्क विभागाचे पाच अधिकारी विना परवानगी इस्रायलला सोशल मीडियाचे प्रशिक्षण घ्यायला गेले; सचिन सांवत यांची चौकशीची मागणी

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी कुणाचीही परवानगी न घेता निवडणुकांच्या आचारसंहिता काळात इस्रायलला सोशल मीडियाचे प्रशिक्षण घ्यायला गेले होते या प्रकरणी चौकशीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

  मुंबई : इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरद्वारे देशात हेरगिरी झाल्या प्रकरणी संसदेत वादळ उठले आहे. राज्यातही पेगागसद्वारे  काही नेत्यांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोनही महाविकास आघाडीचे सरकार बनवत असताना टॅप केल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी कुणाचीही परवानगी न घेता निवडणुकांच्या आचारसंहिता काळात इस्रायलला सोशल मीडियाचे प्रशिक्षण घ्यायला गेले होते या प्रकरणी चौकशीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

  सरकारने मागविला सखोल चौकशीचा अहवाल

  या अधिकाऱ्यांचा पेगाससशी काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला असून त्याच्या सखोल चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारने मागवल्याने हे अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. सांवत यांनी व्टिट करत दावा केला आहे की, फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रात हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? याची चौकशी केली पाहीजे. फडणवीस सरकारच्या काळात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले होते त्याची सध्या चौकशी केली जात आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोण आयपीएस अधिकारी मंत्रालयात बसून हेरगिरी करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

  फोन टॅपिंग व पेगासस समान मानसिकता

  त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले? तेथे त्यांनी कोणते प्रशिक्षण घेतले? परत येऊन कुणाला अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात निवडणुक आयोगाच्या परवानगीशिवाय असे दौरे होणे आश्चर्यकारक व संशयास्पद आहे, असंही त्यांनी म्हटले आहे. हे कोण अधिकारी इस्रायलला किती वेळा गेले? एनएसओ बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? एनएसओशी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? या अगोदरही अशा चौकशीची मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग व पेगासस यामागे समान मानसिकता व हेतू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

  दौऱ्यावर २० लाख रुपये खर्च

  १४ नोव्हेंबर २०१९ रोजी दहा दिवसाच्या दौऱ्यावर मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांच्या दौऱ्यावर २० लाख रुपये खर्च झाला होता. विशेष म्हणजे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन त्यांनी दौऱ्यावर जाणे अपेक्षित असताना हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता दौऱ्यावर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याने ठाकरे सरकारने याबाबत चौकशी अहवाल मागवला आहे.

  सोशल मीडिया आणि सायबर क्राईमचा अभ्यास

  हे अधिकारी शेती विषयाचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेल्याचा  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे फेटाळून लावला आहे. हे अधिकारी सोशल मीडिया आणि सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेले असल्याचे दाखवून देत त्यांनी हा दौरा कशासाठी होता? या दौऱ्यात काय अभ्यास केला? त्याचा पेगाससशी काय संबंध आहे का? असे सावल केले आहेत