पावसाचे स्वागत करणा-या ‘बॅरोमीटर बुश’चा फुलोरा लक्षवेधी ; मेट्रो सिनेमा जवळच्या चौकातील वनस्पतीला आकर्षक फुले

महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्याच्या दुभाजकांमध्ये पर्यावरणपूरक सुशोभीकरण केली जाते. या अंतर्गत सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने आकर्षक फुले येणा-या वा आकर्षक पाने असणाऱ्या वनस्पती लावल्या जातात.

    मुंबई – दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळ असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकामधील वाहतूक बेटावरील पावसाचे स्वागत करणा-या ‘बॅरोमीटर बुश’चा फुलोरा मुंबईकरांचे लक्षवेधून घेत आहे. मुंबई महापालिकेने लावलेल्या ‘ल्युकोफायलम’ वनस्पतींनी बाळसे धरले असून त्यांना आलेली आकर्षक फुले लक्षवेधक ठरली आहेत.

    या फुलांचा मुख्य बहार हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी येतो आणि काही दिवसातच पावसाला सुरुवात होते असे सांगितले जाते. या झाडांना ‘बॅरोमीटर बुश’ या टोपण नावाने जगभरात ओळखले जाते. ही वनस्पती मूलत: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली.

    महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्याच्या दुभाजकांमध्ये पर्यावरणपूरक सुशोभीकरण केली जाते. या अंतर्गत सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने आकर्षक फुले येणा-या वा आकर्षक पाने असणाऱ्या वनस्पती लावल्या जातात.

    यानुसार ‘ए’ विभागांतर्गत असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील वाहतूक बेटावर ‘ल्यूकोफायलम’ची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना मार्च ते नोव्हेंबर या काळात फुले येत असली तरी फुलांचा मोठा बहर हा पावसाळ्यापूर्वी येतो, अशीही माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.