राज्यातील वाढत्या म्युकरमायकोसिसवर लक्ष केंद्रीत करा- उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश

राज्य सरकारने म्युकरमायोसिस आजाराला महामारी घोषित केले आहे. देशभरात सध्या यावरील औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही यावर औषध अँपोथेरिसिन-बीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू - महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी

    मुंबई: देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना पाठोपाठ आता राज्यात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी)च्या साथीची लागण होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरानो काळातील रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठा, रूग्णालयातील खाटांची उपलब्धता हे आता समस्येचे मुद्दे उरलेले नसून म्युकरमायकोसिसशी दोन हात करण्याची वेळ आली असल्याचे मत बुधवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले आणि म्युकरमायकोसिसच्या मुद्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर बुधवारी व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    यावेळी याचिकाकर्त्यांने कोरोनाबरोबरच राज्यात म्युकरमायकोसिसचा आजारा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मे महिन्यात राज्यभरात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच मागील तीन दिवसात फक्त अहमदनगर जिल्ह्यात ९९२८ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोद झाली असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. तसेच या रूग्णना पुरेसा औषधाचा पुरवठा होत नसल्याचा आरोप केला. म्युकरमायकोसिसवर दिवसाला औषधांचे सहा डोस देणे गरजेचे असताना पुण्यात रूग्णांना केवळ एकच डोस दिला जातो याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे ल़क्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार आहे. औषधाअभावी रूग्णांना फरफट होता कामा नये, अशे स्पष्ट करत या आजाराकडे लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला दिले. तसेच म्युकरमायकोसिसच्या मुद्यावर ८ जूनपर्यंत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

    औषध पुरवठा करण्यास राज्य सरकार हतबल

    राज्य सरकारने म्युकरमायोसिस आजाराला महामारी घोषित केले आहे. देशभरात सध्या यावरील औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही यावर औषध अँपोथेरिसिन-बीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच सध्या आम्ही न्यायालयाने कोरोनासंदर्भात दिलेल्या निर्देशांची पूर्तता करत असल्यामुळे पुढील सुनावणीत आम्ही यावर उत्तर देऊ असेही महाधिवक्ता म्हणाले. तेव्हा, परदेशात म्युकरमायकोसिसची काय अवस्था आहे? तिथे भारतापेक्षाही अधिक कोरोना पसरला आहे? असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. हा रोग साथीच्या रोगाप्रमाणे पसरणारा नाही, काही विशिष्ठ वैद्यकीय समस्या असलेल्यांनाच तो होत असल्याचे केंद्र सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले.