पंतप्रधानांना आश्वासनाचा विसर; मोफत लसीवरून रा. काँ.चा निशाणा

मुंबई (Mumbai).  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने बिहारमध्ये मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. मात्र आता पंतप्रधान मोदी म्हणतात कोरोना लसीची किंमत केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल, असे म्हणत आहे. यावरून पंतप्रधानांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. याचबरोबर, प्रत्येक भारतीयांना लस मोफत द्यावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

जनतेकडून पैसे उकळायचे आहेत का?

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि त्यात राज्य व केंद्र सरकार कोरोनावरील लसीची किंमत ठरवेल, असे ते म्हणाले. म्हणजे केंद्र सरकारला जनतेकडून पैसे उकळायचे आहेत का?, हे कसे शक्य आहे. बिहारमध्ये त्यांनी मोफत लस मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही बाब चांगली आहे. मात्र, आमची मागणी आहे की, प्रत्येक भारतीयाला विनाशुल्क लस मिळायला हवी. — नवाब मलिक, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य

लस म्हणजे अमृत नव्हे – आरोग्यमंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र राज्य

कोरोनावरील लस कधी येईल हे आज सांगणे शक्य नाही. पण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचा क्रम ठरविला जाणार आहे. लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. कोरोना झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६०० दिवसांपर्यंत गेले आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरी सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे आहे. मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमध्येच देवाचे दर्शन झाले आहे. कोरोनाकाळात काम करणाऱ्या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे, यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन, अशी ग्वाही टोपे यांनी दिली आहे.