भाजपशी कट्टी, राष्ट्रवादीशी बट्टी ; शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी मंत्र्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड (BEED) जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड (Jaysingh gaikwad) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा भरती आल्याची चित्रे दिसत आहेत.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP)प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या (BJP)बड्या नेत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बीड (BEED) जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड (Jaysingh Gaikwad) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा भरती आल्याची चित्रे दिसत आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, अखेर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली.

जिथे कोंडमार होतो तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही. आता मोकळा श्वास घेत आहे. आम्ही भाजपात आंदोलनं केली, मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, आणि काही नेते हे आयत्या पिठावर रेगोट्ट्या मारतात. हे तर नव्हतेच त्याचा बाप ही नव्हता, असं म्हणत गायकवाड यांनी कुणाचेही नाव न घेता सडकून टीका केली आहे.

कोण आहेत जयसिंगराव गायकवाड?

जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दिवंगत प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष संघटना वाढविण्यात गायकवाड यांचा मोठा वाटा आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून जयसिंगराव गायकवाड हे तीन वेळा भाजप तिकीटावर निवडूण गेले आहेत. तसेच, पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा ते विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत.