सरसंघचालक म्हणून आपण त्यांना योग्य ती समज का देत नाही ? कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईचे सरसंघचालक मोहन भागवतांना खुले पत्र!

कॉंग्रेसचे कोकणातील नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना अनावृत्त पत्र पाठवले आहे. पंतप्रधानाना  कुणीच सल्ला दिल्याचे आवडत नसल्यानेच आपणही गप्प बसता काय? असा  थेट सवाल त्यांनी सरसंघचालकांना पत्रात  केला आहे.

  मुंबई : करोना साथीच्या काळात केंद्र सरकार नियोजनात अपयशी ठरले तरी भाजपचे अनेक नेते केवळ केंद्राच्या चुकांवर बोट दाखवणाऱ्यांवर टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत. अश्या वेळी सरसंघचालक म्हणून आपण त्यांना योग्य ती समज का देत नाही ? असा सवाल  कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यानी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुल्या पत्राव्दारे केला आहे.

  कॉंग्रेसचे कोकणातील नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना अनावृत्त पत्र पाठवले आहे. पंतप्रधानाना  कुणीच सल्ला दिल्याचे आवडत नसल्यानेच आपणही गप्प बसता काय? असा  थेट सवाल त्यांनी सरसंघचालकांना पत्रात  केला आहे.

  विचारांवर अंमलबजावणी केवळ गडकरीची

  त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सरसंघचालक भागवत यांनी, एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे मोडण्याचा हा काळ नाही, असे करोनाबाबत बोलताना एका भाषणात म्हटले होते. त्याचा दाखला देत, या आपल्या विचारांवर अंमलबजावणी केवळ नितीन गडकरी यांनीच कशी काय केली. इतरांना हे का सुचले नाही’, असा सवाल दलवाई यांनी केला आहे.

  आपण जाब विचारायला हवा होता

  दलवाई लिहितात की, ‘पहिली लाट येण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गर्दी करून स्वागत करणे, देशातील विविध विमानतळांवर परदेशातून हजारो लोकांना येऊ देणे, अचानक टाळेंबदी जाहीर करून गरिबांना शेकडो मैलांची पायपीट करत आपापल्या गावी जायला भाग पाडणे, दुसरी लाट येण्याची भिती तज्ज्ञ वर्तवत असतानाही पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेऊन चारही राज्यांत हजारोंच्या जाहीर सभा आयोजित करणे, उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आयोजित करणे, कुंभमेळा आयोजित करणे आदी गोष्टींबाबत सरसंघचालक म्हणून आपण जाब विचारायला हवा होता’, असेही या पत्रात म्हटले आहे.

  सर्वाधिक मान्यता असलेले सरसंघचालक
  पारूल खक्कर या कवियत्रीने सध्याच्या भयावह स्थितीवर केलेल्या कवितेला २८ हजार ट्रोलर्सनी लाखोली वाहिली. आपण त्यांना थांबवू शकत नाही का, असा प्रश्नही त्यांनी भागवत यांना केला आहे. गोळवकर गुरूजी व बाळासाहेब देवरस यांच्यानंतर सर्वाधिक मान्यता असलेले आपण सरसंघचालक आहात. या मान्यतेचा उपयोग करून सरकारला योग्य त्या मार्गावर आणण्याचे काम आपण करायला हवेत, असे दलवाई यांनी म्हटले आहे.

  आपल्याकडून अशीच अपेक्षा

  १५ ऑगस्ट, १९४७ ला देश स्वतंत्र झाला तेव्हा नेहरू दिल्लीत तिरंगा फडकावत होते. मात्र महात्मा गांधी नौखालीत सुऱ्हावर्धींमुळे सुरू झालेली दंगल शमवत होते. भितीने हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू लावत नव्हत्या. गांधीजी घराघरात कुंकवाचा करंडा घेऊन हिंदू महिलांना कपाळावर कुंकू लावण्याची हिम्मत देत होते. आपल्याकडून अशीच अपेक्षा सारा देश करत असल्याचे दलवाई यांनी भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.