माजी गृहमंत्र्यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयानं जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

  मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयानं जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख हे एकूण १४ कोटीच्या संपत्तीचे मालक असून ईडीने त्यातील ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्याने देशमुख यांना मोठा झटका बसला आहे.

  ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी वारंवार कार्यालयात बोलावलं. त्यासाठी समन्स जारी करण्यात आलं. मात्र तीन समन्सनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र हे दोघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत.

  १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात ईडीला त्यांच्या पत्नी आणि मुलाची चौकशी करायची होती.

  भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं अनिल देशमुखांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी घातल्या. देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आली. या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे.

  चुकीच्या पध्दतीने लाभ मिळवण्याप्रकरणी गुन्हा

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने भादंवि च्या कलम १२०-ब आणि १८६० तसेच हवाला अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत सीबीआय मार्फत चुकीच्या पध्दतीने लाभ मिळवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी केली आणि हवाला प्रकरणी ही कारवाई केली आहे.

  शंभर कोटी वसुली करण्याचे कथित आरोप

  मुंबईतील बार आणि हॉटेल चालकांकडून प्रति माह शंभर कोटी वसुली करण्याच्या कथित आरोपा प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात ही कारवाई केली जात आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्या मार्फत ४.७० कोटी रूपयांची वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे पैसे हवाला मार्फत विवीध कंपन्यामध्ये गुंतविण्यात आल्या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

  वरळी येथील फ्लँट पत्नीच्या नावे

  या शिवाय देशमुख परिवाराच्या श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्ट च्या मार्फत कंपन्यातील पैसे अन्यत्र वळविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. देशमुख यांचा वरळी येथील फ्लँट त्यांच्या पत्नी आरती यांच्या नावावर आहे. त्यासाठी सन २००४मध्ये संपूर्ण व्यवहार नगद पैसे देवून करण्यात आला होता. मात्र त्याची नोंदणी सन २०२०मध्ये करण्यात आली. ज्यावेळी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. देशमुख यांच्या परिवाराचे मे. प्रिमीयर पोर्ट लिंक्स प्रा. लि. मध्ये पन्नास टक्के मालकी हक्क आहेत. या संस्थेची जमीन आणि दुकान यांची किंमत ५.३४ कोटी आहे मात्र त्यात देशमुख परिवाराचा हिस्सा केवळ १७.९५ लाख रूपये आहे.

  तुम्हाला या बातमी बाबत काय वाटते ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…