कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक…

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा मारून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.

  मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा मारून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.

  दरम्यान या प्रकरणी गुंतवणूकदारांनी दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. त्यानंतर प्रमुख संशयित, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

  पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सील केली आहेत. न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

  मुंबई ईडी झोन-२चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना रायगड येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदार

  पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले. कर्नाळा बँकेत ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी आहेत. यामध्ये पनवेल, उरणमधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत.

  महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चेदेखील काढले होते.

  कर्नाळा बँक अध्यक्ष, संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा

  कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

  गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण यात खूप मोठं मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला होता.