माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तब्बल २४ लाखांचे घरभाडे थकवले, कारवाईची शक्यता

अधिकाऱ्यांची पोस्टिंग समाप्त झाल्यावर १५ दिवसांत राहत असलेले सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी सूट मिळते. या काळात सरकार केवळ लायसन्स फी आकारते. जर या १५ दिवसांत अधिकाऱ्यांनी आपले निवासस्थान खाली केलं नाही तर सरकार त्यांच्याकडून भाडे आणि पेनल्टी दोन्ही वसुल करते.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मलबार हिल परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचं तब्बल २४ लाखांचे भाडे दिले नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

    लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांनी प्रति महिना कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १८ मार्च २०१५ मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाले. त्यापूर्वी ते मुंबईत स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अॅडिशनल डीजीपी होते. या काळात परमबीर सिंह यांना मलबार हिल्स परिसरातील बीजी खेर मार्गावर असलेले निलिमा अपार्टमेंट हे सरकारी निवासस्थान वास्तव्यास देण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्त ठाणे पोलीस आयुक्तपदी झाली. त्यांना ठाण्यात सरकारी निवासस्थान मिळाले असताना सुद्धा त्यांनी निलिमा अपार्टमेंट खाली केलं नाही.परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून १७ मार्च २०१५ ते २९ जुलै २०१८ पर्यंतचे घरभाडे आणि पेनल्टी जोडून सुमारे ५४.१० लाख रुपये थकित देणे आहे. एका रिपोर्टनुसार, ३५ आयपीएस अधिकाऱ्यांवर जवळपास ४ कोटी रुपये घरभाडे आणि पेनल्टी दिली नसल्याची माहिती आहे. नियमानुसार एकाचवेळी दोन सरकारी निवासस्थान अधिकाऱ्यांना वापरता येत नाही.

    अधिकाऱ्यांची पोस्टिंग समाप्त झाल्यावर १५ दिवसांत राहत असलेले सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी सूट मिळते. या काळात सरकार केवळ लायसन्स फी आकारते. जर या १५ दिवसांत अधिकाऱ्यांनी आपले निवासस्थान खाली केलं नाही तर सरकार त्यांच्याकडून भाडे आणि पेनल्टी दोन्ही वसुल करते.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुठल्याही अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थानात राहता येत नाही. आम्ही हे थकीत घरभाडे आणि पेनल्टी त्यांच्या पगारातून कापून घेऊ आणि जर हे शक्य झाले नाही तर आम्ही जून २०२२ मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर ही रक्कम वसुल करु.