माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या प्रकरणी राजच्या पत्नीने पोलीसात फिर्याद दिली आहे. पाळत ठेवणे (स्टॉकिंग), धमकावणे (क्रिमिनल इंटीमिडेशन) आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली असून राज यांच्याविरोधात भादंवि कलम ३५४ (डी), ५०६ (२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांचा मुलगा राज त्यागी याला वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी राजच्या पत्नीने पोलीसात फिर्याद दिली आहे. पाळत ठेवणे (स्टॉकिंग), धमकावणे (क्रिमिनल इंटीमिडेशन) आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली असून राज यांच्याविरोधात भादंवि कलम ३५४ (डी), ५०६ (२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    कोण होते रामदेव त्यागी?
    रामदेव त्यागी हे महाराष्ट्र केडरचे १९६४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. १९९५ या कालावधीत त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे महासंचालक असताना ते सेवानिवृत्त झाले होते.

    वादग्रस्त कारकीर्द
    १९९३ मधील दंगलीच्या कालावधीत त्यागी हे मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त होते. त्यांच्या नेतृत्वात पथकाने सुलेमान बेकरीत केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी २००१मध्ये राज्य सरकारच्या विशेष पथकाने १८ पोलिसांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र यातील ९ जणांची न्यायालयाने २००३ मध्ये मुक्तता केली होती, त्यामध्ये त्यागी यांचाही समावेश होता.

    निवृत्त एसीपीच्या मुलाला बेड्या

    दुसरीकडे, मुंबई एनसीबीने महाराष्ट्र पोलिसातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) मुलाला ड्रग्ज प्रकरणात बेड्या ठोकल्या होत्या. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी गोरेगाव भागात छापा टाकला होता. यावेळी १०० हून अधिक एलएसडी ब्लोट्ससह त्याला अटक करण्यात आली होती. संबंधित एसीपीने नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांचा सामना केला होता, मात्र त्यांना आपल्याच मुलाबद्दल माहित नसल्याचा दावा केला जात आहे.