माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचं अल्पशा आजाराने निधन

कोकण मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आलेले माजी आमदार रामनाथ मोते सर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. मात्र आज सकाळी मुलुंड मधील फोर्टिस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे आणि कोकण मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आलेले माजी आमदार रामनाथ मोते सर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. मात्र आज सकाळी मुलुंडमधील फोर्टिस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रामनाथ मोते सरांनी शिक्षण व शिक्षकांसाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. केवळ विधान परिषदेत आवाज उठवणे इतकेच नव्हे तर रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण करणं हे त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकवेळा केलं. तसेच शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत ते लढत राहिले. मागील ४२ वर्षांपासून रामनाथ मोते हे शिक्षण चळवळीत विशेषतः शिक्षक शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर लढा देत होते.

विधी मंडळात १०० टक्के उपस्थित राहत असत. विधिमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा विधिमंडळात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला होता. रामनाथ मोते यांच्या जाण्यामुळे शैक्षणिक चळवळीचे मोठे नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षक-शिक्षकेतरांच्या सेवा शर्तीच्या अनेक समस्या त्यांनी मांडून सोडविल्या होत्या. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक-शिक्षकेतरांशी त्यांचा संपर्क होता. रामनाथ मोते यांच्या जाण्यामुळे शैक्षणिक चळवळीचे मोठे नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे रामनाथ मोते यांचे १५ वर्ष सहकारी असलेले व मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मोते सरांनी उल्हासनगर जिल्हा कार्यवाह कोकण विभाग कार्यवाह राज्य कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर बहुमूल्य काम केल आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार संजीवनी रायकर, राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, बाबासाहेब काळे, रवींद्र इनामदार, नरेंद्र वातकर, जिल्हाध्यक्ष आर. डी. पाटील, कार्यवाह गुलाबराव पाटील, महिला अध्यक्षा हेमलता मुनोत व इतर पदाधिकार्यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.